पैठणच्या कारखान्यात ४० लाखांची चोरी
By Admin | Updated: September 4, 2014 00:53 IST2014-09-04T00:32:49+5:302014-09-04T00:53:10+5:30
पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातून ४० लक्ष रुपयांचे मशिनरी पार्ट चोरी गेल्याचे उघडकीस आले आहे.

पैठणच्या कारखान्यात ४० लाखांची चोरी
पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातून ४० लक्ष रुपयांचे मशिनरी पार्ट चोरी गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी कारखाना प्रशासनाने कुठलीही फिर्याद अद्याप पोलिसांत दिलेली नाही. मात्र, आ. संजय वाघचौरे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आ. वाघचौरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कारखान्यातून पंप असेम्ब्ली, घन मेटल, बॉयलर ट्यूब, हाप बेरिंग (११) व पितळी पार्ट चोरीस गेलेले आहेत. याची अंदाजे किंमत ४० लक्ष असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वीसुद्धा कारखान्यात चोरी झाली होती. विशेष म्हणजे कारखान्यात सुरक्षारक्षक तैनात आहे, असे असतानाही चोरी कशी होते. कारखान्यातून या वस्तूंची चोरी करण्यासाठी ट्रकचा वापर करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. आ. वाघचौरे यांनी केलेल्या या आरोपाच्या पार्श्वभूमीवर कार्यकारी संचालक भीमराव डोके यांना विचारणा केली असता कारखान्यातून काही वस्तू चोरीस गेल्याची कबुली त्यांनी दिली. चेअरमन मुंबई येथे गेलेले असून ते आल्यावर अहवाल घेऊन फिर्याद देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कारखाना सुरू करण्यासाठी आपण पाहिजे ती मदत करण्यास तयार आहोत; परंतु चेअरमन वेळकाढू धोरण राबवीत आहेत. कारखाना चालू करण्यासाठी चेअरमन संदीपान भुमरे यांनी बैठक घ्यावी. मी बैठकीस उपस्थित राहून मदत करीन, असा दावा आ. संजय वाघचौरे यांनी केला आहे.