४आॅगेस्टअखेर पुरेल एवढे पाणी
By Admin | Updated: November 23, 2014 00:23 IST2014-11-23T00:09:26+5:302014-11-23T00:23:19+5:30
जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही.

४आॅगेस्टअखेर पुरेल एवढे पाणी
जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. आॅगस्टअखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा नगर पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता शहर पाणीपुरवठ्याबाबत मनोहरे यांनी विचार असता त्यांनी टंचाई नसल्याचे सांगितले.
गत दोन वर्षांपूर्वी जालनेकरांनी अभूतपूर्व अशा पाणीटंचाईचा सामना केला. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. हजारो रुपये पाण्यात घातले. एवढे करुनही शहरवासियांची तृष्णा भागू शकली नाही. याच पार्श्वभूमीवर मनोहरे म्हणाले की, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या घाणेवाडी जलाशयात यात १२ फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. यामुळे नवीन जालनावासियांना व्यवस्थित पाणी मिळत आहे. जुना जालना भागासाठी जायकवाडी- जालना योजनेतून पाणी मिळते. या भागातील दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. काही भागात अंतर्गत जलवाहिनी नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळत नाही. मात्र, नगर पालिकेकडून बहुतांश भागात पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मुख्याधिकरी म्हणत असले तरी नवीन व जुना जालना भागातील अनेक ठिकाणी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यास पालिकेचा कारभार जबादार असल्याची चर्चा आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी वाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी होत असून पालिकेचे त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)
गत वर्षीच्या तुलनेत यंदा शहर परिसरात पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी नगर पालिकेकडून नियोजन करण्यात येत असल्याचे मनोहरे म्हणाले. जलवाहिनी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यासोबतच गरज पडल्यास टँकरद्वारे पाणीपुरठा करण्यात येईल. ज्या भागात जलवाहिन्या नाहीत तेथेही पालिकेकडून सर्वेक्षण करुन पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे.
४दरम्यान, पालिकेकडून नियोजनाचा डंगोरा पिटला जात असला तरी पालिकेचे नियोजन ऐनवेळी कोलमडत असल्याचे सर्वश्रुत आहे. पालिकेकडून उडवाउडवाची तसेच थातूरमातूर नियोजन करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असाही आरोप होतो. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पालिका पाण्याचे काय नियोजन करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मनोहरे म्हणाले, ज्या भागात जलवाहिन्या नाहीत अथवा पाणीटंचाई भासू शकते तेथे कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव आहे. अंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीचेही कामे करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमित कर भरण्याचे आवाहन केले. जेणे करुन मूलभूत सुविधा पुरविण्यास मोठी मदत होईल.