‘त्या’ आरोपीला ४ दिवसांची कोठडी
By Admin | Updated: November 25, 2015 23:17 IST2015-11-25T23:03:35+5:302015-11-25T23:17:02+5:30
बदनापूर : तालुक्यातील दाभाडी शिवारातील शेतात महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस न्यायालयासमोर

‘त्या’ आरोपीला ४ दिवसांची कोठडी
बदनापूर : तालुक्यातील दाभाडी शिवारातील शेतात महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान महिलेचे शवविच्छेदन औरंगाबाद येथे करण्यात आले असून, डीएनए चाचणीसाठी नमुने मुंबईत फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तालुक्यातील दाभाडी शिवारातील संतुकराव कोल्हे यांच्या ज्वारीच्या शेतात सोमवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तेथील परिस्थिती पाहता या महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच मृतदेहाजवळ जुम्मेखान यांचे आधार कार्ड व ओळखपत्र सापडले होते. त्यावरून जुम्मेखान यांनीच हे कृत्य केल्याचा संशय घेऊन विठ्ठल उत्तम सावंत यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून बदनापूर पोलिसांनी संशयीत शेख जुम्मेखा न्यामत खॉ शेख (रा बानेगाव ता. भोकरदन) याच्याविरुद्ध खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती.
सदर महिलेच्या मृतदेहाचे बुधवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. दुपारी ३ वाजता या महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक स्वरूपात दिलेल्या शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्याच्या आतील भागात रक्तस्त्राव झाल्याचे म्हटले आहे.
अद्याप अनेक बाबींचा अहवाल आलेला नाही. या प्रकरणातील तपास करणारे उपनिरीक्षक चैनसिंग घुसिंगे म्हणाले की, या महिलेच्या शवविच्छेदनात पोलिसांनी या महिलेचा मृत्यू कधी झाला, तिचा मृत्यू अत्याचारानंतर किंवा आधी झाला का, तिच्यावर किती जणांनी अत्याचार केला असे विविध मुद्यांवर अहवाल मागवला आहे. यापैकी महिलेचा मृतदेह आढळल्याच्या १६ तासांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच या प्रकरणी महिलेच्या शवविच्छेदनातील काही नमुने व आम्ही जप्त केलेले नमुने या सर्वांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. हे सर्व नमुने मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात अन्य कोणी आहे का? असतील तर ते किती जण आहेत अशा विविध प्रश्नांची उत्तरे लवकरच शोधण्याचा प्रयत्न करू , असा विश्वास घुसिंगे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)