४ कोटी २५ लाखांची डॉक्टरची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:54 IST2017-09-08T00:54:27+5:302017-09-08T00:54:27+5:30
व्यावसायिक स्पर्धेतून एका डॉक्टरला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वासघात करीत ४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेट्रोपॉलिस हेल्थ केअर कंपनीच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

४ कोटी २५ लाखांची डॉक्टरची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : व्यावसायिक स्पर्धेतून एका डॉक्टरला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वासघात करीत ४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेट्रोपॉलिस हेल्थ केअर कंपनीच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अमीरा शहा, डॉ. सुनील शहा, वीरेंद्र सिंग, डॉ. नीलेश शहा, राहुल कवानकर यांच्यासह संचालक मंडळाचा आरोपींत समावेश आहे. आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार डॉ. दिलीप मुळे यांची उस्मानपुरा येथे ‘मुळे डायग्नोस्टिक सेंटर’ ही लॅब अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. २०११ मध्ये मुंबईतील मेट्रोपॉलिस हेल्थ केअर प्रा. लि.चे प्रतिनिधी डॉ. मुळे यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्या लॅबची पाहणी केली. मुंबईतील त्यांच्या कंपनीशी भागीदारी करा आणि मराठवाड्यासह परिसरातील दहा जिल्ह्यांत फ्रॅन्चायझीच्या माध्यमातून एकत्र व्यवसाय करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. यात मोठा नफा असल्याचे आमिष त्यांनी दाखविले. डॉ. मुळे यांना प्रस्ताव आवडल्याने त्यांनी आरोपींसोबत करार केला. करारानुसार आरोपी तक्रारदार मुळे यांना १ कोटी ७६ लाख रुपये देणार होते. शिवाय अस्तित्वात असलेल्या १ कोटी २० लाख रुपयांचा व्यवसाय तक्रारदार यांच्याकडे वर्ग करणार होते; परंतु करारानुसार आरोपींनी तसे केलेच नाही. एवढेच नव्हे तर मेट्रोपॉलिस हेल्थ केअर प्रा. लि. या त्यांच्या सर्व फ्रॅन्चायझी बंद करतील आणि नवीन एकही शाखा सुरू करणार नाही, असे करारात नमूद असताना औरंगाबादेत आजही आरोपींच्या कंपनीची फ्रॅन्चायझी सुरू आहे.