बजाजनगरात ४ दुचाकी जाळल्या
By Admin | Updated: December 21, 2014 00:17 IST2014-12-21T00:03:10+5:302014-12-21T00:17:38+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात वाहने जाळणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू असून, दोन दिवसांनंतर या टोळीने चार दुचाक्या पेटवून दिल्याची घटना काल रात्री बजाजनगरात घडली.

बजाजनगरात ४ दुचाकी जाळल्या
वाळूज महानगर : बजाजनगरात वाहने जाळणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू असून, दोन दिवसांनंतर या टोळीने चार दुचाक्या पेटवून दिल्याची घटना काल रात्री बजाजनगरात घडली. या टोळीने आणखी दुचाकीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे फसला.
बजाजनगरात दोन दिवसांपूर्वीच दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच काल १९ डिसेंबरला रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरू टोळीने बजाजनगरातील रुक्सन हाऊसिंग सोसायटीतील तीन दुचाकींना आग लावली. या दुचाकी जळत असताना स्फोटासारखा आवाज आल्यामुळे प्रवीण देसले घराबाहेर आले असता त्यांना घरासमोर दुचाकी जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडल्यामुळे उषा देसले, मनीषा पाटील, नीलेश देसले, किशोर ब्रह्माणजाई, विकास बहुरे, बबनराव चौरे, सुहास पाटील, गणेश डोरके, राहुल पाटील यांनी घराबाहेर येऊन पेटलेल्या दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत राहुल रमेश पाटील यांची एमएच-२०, सीडब्ल्यू-३२३९, गणेश माणिकराव डोरके यांची एचएच-२०, बीएम-९१६७ व सुहास भास्कर पाटील यांची एमएच-२०, सीडी-३२८५ आणि फतरूशहा भिकनशहा यांची एमएच-२0 डीसी-२८२४ या चार दुचाकी भस्मसात झाल्या. घटनेची माहिती मिळताच फौजदार प्रवीण पाटील, सहायक फौजदार एस.बी. सानप, पोहेकॉ. एस.वाय. गायकवाड, पोहेकॉ. अर्जुनराव गावंडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी
केली. या प्रकरणी राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार सानप करीत आहेत.
दोन दुचाकी बचावल्या
या सोसायटीत एकाच रांगेत उभ्या असलेल्या चार दुचाकी माथेफिरूने पेटवून दिल्या होत्या. लगतच उभ्या केलेल्या एका स्कूटीवर व एका दुचाकीवर पेट्रोल ओतण्यात आले होते. मात्र, दुचाकी जळत असताना नागरिक विझविण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे या दुचाकींना आग न लावताच माथेफिरू पकडल्या जाण्याच्या भीतीने पसार झाले.
प्रसंगावधान राखून प्रवीण देसले या युवकाने या दुचाकी बाहेर काढल्यामुळे त्या आगीपासून बचावल्या आहेत.
अज्ञात माथेफिरू टोळीने बजाजनगर व परिसरात आतापर्यंत जवळपास २० ते २५ चारचाकी वाहने, तर १०० च्या आसपास दुचाकी पेटवून दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी १७ डिसेंबरला मध्यरात्री १.४५ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील स्वेदशिल्प हौसिंग सोसायटीतील प्रदीप शिवप्रसाद तिवारी यांची पल्सर (क्रमांक एमएच-२० सीजे ९२०७) ही दुचाकी अज्ञात माथेफिरूने पेटवून दिली होती. दुचाकी जळत असताना मोठ्या स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे रूपाली फलटणे या गृहिणीने आरडाओरडा केल्यामुळे गोकुळ परदेशी यांची लोडिंग रिक्षा (क्रमांक एमएच-२० सीटी-२१०) ही बचावली होती.