आष्टीत पुन्हा ‘थ्री डी’!

By Admin | Updated: April 8, 2017 21:37 IST2017-04-08T21:35:07+5:302017-04-08T21:37:06+5:30

बीड : जिल्हा परिषदेत भाजपला टेकू दिल्यानंतर माजी मंत्री सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित करून दणका दिला.

'3D' again! | आष्टीत पुन्हा ‘थ्री डी’!

आष्टीत पुन्हा ‘थ्री डी’!

बीड : जिल्हा परिषदेत भाजपला टेकू दिल्यानंतर माजी मंत्री सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित करून दणका दिला. त्यामुळे राजकीय गणिते बऱ्याचअंशी बदलली असून आष्टीत पुन्हा ‘थ्रीडी’ (धस-धोंडे- दरेकर) असे जुने समीकरण पुन्हा नव्याने जुळणार आहे. धस यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात असून त्यांच्या प्रवेशाने आधीच भाजपच्या आश्रयाला असलेल्या नेत्यांत अस्वस्थता पसरली आहे. धसांच्या निलंबनानंतर आता राष्ट्रवादीला नवा भक्कम पर्याय द्यावा लागणार आहे.
अंतर्गत मतभेदामुळे राष्ट्रवादी काँगे्रेसच्या हातातोंडाशी आलेला जि.प.मधील सत्तेचा घास भाजपने हिरावून घेतला. माजी मंत्री सुरेश धस यांनी आपल्याकडील पाच सदस्य भाजपकडे वळविल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी लावून धरली होती. शिवाय कारवाई न झाल्यास स्वत: पक्षातून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राकाँने सुरेश धस यांना उमेदवारी दिली होती. शिवाय सत्ता असताना राज्यमंत्रीपद व ‘महानंद’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची धुराही सोपवली होती. असे असतानाही धस यांच्या पक्षविरोधी भूमिकेचा वार श्रेष्ठींच्या जिव्हारी लागला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनेही धसांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. दुसरीकडे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नेमून बळ दिले आहे.
दरम्यान, आष्टी- पाटोदा- शिरुर मतदारसंघात भाजपचे आ. भीमराव धोंडे हे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत माजी आ. साहेबराव दरेकर हे देखील आहेत. त्यात आता धस यांची भर पडणार आहे. यापूर्वी हे तिघेही एका पक्षात होते. तेव्हा ‘थ्रीडी’ च्या राजकीय समीकरणाचा मोठा बोलबाला होता. आता पुन्हा एकदा मतदारसंघात हे तीन मातब्बर नेते एकाच पक्षात दिसणार आहेत. धस पक्षात आल्यास आ. धोंडे व माजी आ. दरेकर या दोघांचीही गोची होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाचा या दोघांनीच अधिक ‘धस’का घेतल्याचे जाणवते. याशिवाय जि.प. सदस्य बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, दिलीप हंबर्डे यांचीही पंचाईत होणार आहे.
धस यांच्यावरील कारवाईनंतर या मतदारसंघात झालेली पडझड भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीला नवा मोहरा द्यावा लागणार आहे. धसांच्या भाजपप्रवेशामुळे दुखावलेला भाजपमधील तगडा शिलेदार गळाला लागतो का? याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. काहीजण संपर्कात असल्याचे राकाँतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: '3D' again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.