अभियांत्रिकीच्या ३८ हजार जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:06 IST2017-08-11T00:06:05+5:302017-08-11T00:06:05+5:30
राज्यात अभियांत्रिकीच्या एकू ण १ लाख ४८ हजार ३२७ जागांपैकी तब्बल ३८ हजार १६ जागा नोंदणीविनाच रिक्त राहिल्या आहेत.

अभियांत्रिकीच्या ३८ हजार जागा रिक्त
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य सरकारने अभियांत्रिकी, औषधनिर्माणच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेला (एमएचटी-सीईटी २०१७) बसलेल्यांपैकी १ लाख १० हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. यामुळे राज्यात अभियांत्रिकीच्या एकू ण १ लाख ४८ हजार ३२७ जागांपैकी तब्बल ३८ हजार १६ जागा नोंदणीविनाच रिक्त राहिल्या आहेत. यात नोंदणीनुसार कॅप फेरीत नंबर लागल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या ५० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता अधिकाºयांनी व्यक्त केली.
राज्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्य सरकारच्या सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशासाठीच्या कटआॅफला मुदतवाढ देण्यास हिरवा कंदिल दाखविल्यामुळे ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेश मिळणार आहेत. सीईटीला तब्बल ३ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली होती. यातील १ लाख १० हजार ३११ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी नावनोंदणी केली आहे. या नावनोंदणीला एक वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. तरीही उपलब्ध जागांच्या तुलनेत ३८ हजार १६ विद्यार्थी नोंदणीच्या वेळीच कमी पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. आतापर्यंत प्रवेशासाठी कॅपच्या चार फेºया झाल्या आहेत. चौथ्या फेरीअखेर अभियांत्रिकीच्या रिक्त जागांचा आकडा ५० हजारांपेक्षा अधिक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कटआॅफ वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.