३७७३ रुग्णांना लाभ
By Admin | Updated: August 17, 2014 01:42 IST2014-08-17T01:09:28+5:302014-08-17T01:42:02+5:30
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत.

३७७३ रुग्णांना लाभ
औरंगाबाद : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २४ हॉस्पिटल संलग्न करण्यात आलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ३०८ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर आतापर्यंत ३ हजार ७७३ उपचार करण्यात आले आहेत. त्यांच्या उपचारावर शासनाने आतापर्यंत १० कोटी ७४ लाख ४ हजार १५ रुपये खर्च केले आहेत.
कोणताही रुग्ण पैशाअभावी उपचारपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने गतवर्षीपासून महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला एक लाखापर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. तसेच विविध गंभीर आजारांसाठीही स्वतंत्र पॅकेज देण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयासोबत औरंगाबादेतील २२ खाजगी रुग्णालयातही उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णास केवळ रेशनकार्ड अथवा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र सोबत घेऊन जावे लागते. या कागदपत्राच्या आधारे सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्यात येतात. अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात सर्वाधिक ३९६ कुटुंबांतील ५०५ जणांवर शस्त्रक्रिया उपचार करण्यात आलेल्या त्यासाठी जीवनदायी योजना राबविणाऱ्या संस्थेकडून त्यांना २ कोटी ४० लाख ६२ हजार ७५० रुपये प्राप्त झाले आहेत. कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४८५ कुटुंबांतील ८७४ रुग्णांवर उपचार झाले. त्यासाठी या रुग्णालयास २ कोटी ५७ लाख ८ हजार ८०० रुपये मिळाले. घाटी रुग्णालयात यावर्षी आतापर्यंत ८४२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर शासकीय कॅन्सर रुग्णालयात १४३ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत रुग्णांवर केलेल्या उपचाराच्या खर्चापोटी रुग्णालयांना अनुक्रमे ११ लाख ८ हजार रुपये आणि १ कोटी ३८ लाख ६ हजार ३८५ रुपये प्राप्त झाले आहेत. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्येही सुमारे ४४५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यासाठी त्यांना १ कोटी ५९ लाख ४४ हजार २४० रुपये उपचाराचा खर्च म्हणून प्राप्त झाला आहे.