३७ प्रवासी बालंबाल बचावले
By Admin | Updated: September 25, 2016 23:57 IST2016-09-25T23:53:46+5:302016-09-25T23:57:32+5:30
जालना : खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याबरोबरच बसेसचे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, खडतर प्रवास करावा लागत आहे

३७ प्रवासी बालंबाल बचावले
जालना : खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याबरोबरच बसेसचे नुकसान होत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत असून, खडतर प्रवास करावा लागत आहे. हाच धागा पकडून रस्ते दुरूस्ती करण्यासंदर्भात जालना आगारप्रमुखांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप याची दखल घेतलेली नाही.
जिल्ह्यात खराब रस्त्यांमुळे आजही अनेक ठिकाणी बससेवा पोहचली नाही. तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांच्या सेवेसाठी नाईलाजास्तव रापमला खड्डेमय रस्त्यांवरून बसेस सोडण्याची वेळ आली आहे. परंतु यामुळे बसेस पंक्चर होणे, स्टेअरींग रॉड तुटने, पत्र्यांचे रिबीट तुटने, आसण व्यवस्था खिळखिळी होणे, बोल्ट निकामी होणे, डिझेल टँकला धोका पोहचणे यासह अनेक समस्यांमुळे प्रवाशांना नेहमी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या खराब रस्त्यांबाबत राज्य परिवहन महामंडळाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांनी याची गांभीर्याने कधीच दखल घेतली नाही.
सा.बां.विभागाच्या दुर्लक्षामुळेच आज प्रवाशांना खडतर प्रवास करण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
सोलापूर-औरंगाबार महामार्गावर महाकाळा पाटीजवळ दोन दिवसांपूर्वीच खड्डयांमध्ये बस आदळल्याने स्टेअरींग रॉड तुटून बस महामार्गालगतच्या खड्डयांत जाऊन पलटी झाली होती. परंतु बसेसचा वेग नियंत्रणात असल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या बसेसमधील ३७ प्रवासी या अपघातात बालंबाल बचावले होते. यापूर्वीही खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात झालेले असतानाही रस्ते दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.