३६५ दिवस कार्यरत राहणारा शिक्षक
By Admin | Updated: September 5, 2014 00:13 IST2014-09-04T23:41:27+5:302014-09-05T00:13:19+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी येथील जिल्हा परिषदेच्या माळीवाडा शाळेत आदर्श घडविण्यात आला आहे़

३६५ दिवस कार्यरत राहणारा शिक्षक
विठ्ठल भिसे, पाथरी
काही माणसे ध्येयवेडे असतात. एका ध्येयाने झपाटले की ते साध्य करण्यासाठी वाट्टेल तेवढे परिश्रम घेतात आणि अशीच माणसे आदर्शही ठरतात़ येथील जिल्हा परिषदेच्या माळीवाडा शाळेतही असाच आदर्श घडविण्यात आला आहे़
जि़ प़ ची नोकरी करीत असताना शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित ३६५ दिवस शाळा भरवून माळीवाडा येथील जि़प़ शाळेचे मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी आदर्श निर्माण केला आहे़ शिक्षक दिनानिमित्त अशा शिक्षकांची निश्चित आठवण झाल्याशिवाय राहत नाही़ आजचे शिक्षण स्पर्धेचे झाले आहे़ खाजगी शाळा गतीने पुढे जात आहे़ परंतु, जि़ प़ च्या सरकारी शाळांमधील परिस्थिती सुधारण्यास अवधी लागणार आहे़ एखाद्या शिक्षकाने मनावर घेतल्यास ही परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही हे ही तेवढेच खरे़ पाथरी शहरात माळीवाडा परिसरात जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे़ जि़ प़ ची शाळा म्हटलं की अनेक समस्या, पालकांची अनास्था असे चित्र डोळ्यासमोर येते़ परंतु, या शाळेत २००८ साली बजरंग गिल्डा, मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि शाळेचा कायापालटच झाला़
येथील शालेय व्यवस्था बदलण्याची जबाबदारी स्वीकारून पालकांच्या मदतीने गुणवत्ता विकास पॅटर्न त्यांनी राबविला़ शाळेचा नक्षा बदलविला़
१७० वरून विद्यार्थी संख्या ५६५ वर गेली़ शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी संगणक, साऊंड सिस्टीमसह उपलब्ध केले आणि ३६५ दिवस विना सुटी शाळा घेतली़ वर्षभरात १०० परीक्षा, आदर्श परिपाठ असे उपक्रम राबवित मागील तीन वर्षे जिल्हा पारितोषिक प्राप्त केले़ लोकवर्गणी जमा करून सर्व कामे तडीस नेणाऱ्या मुख्याध्यापक बजरंग गिल्डा या शिक्षकाच्या कर्तृत्वाला शालेय शिक्षण समितीचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे़ त्यामुळेच ही शाळा जिल्ह्यामध्ये आदर्श ठरली़
चांगले काम करण्याची तयारी आणि मनात जिद्द असल्याने शालेय शिक्षण समिती आणि ग्रामस्थांच्या मदतीने मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांनी माळीवाडा शाळेचा नावलौकिक वाढविला़ शैक्षणिक दर्जा कायम राखत केलेले हे कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे़