गटामध्ये ३६ तर गणात ६८ उमेदवार
By Admin | Updated: February 8, 2017 00:19 IST2017-02-08T00:16:40+5:302017-02-08T00:19:54+5:30
कळंब : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ३६ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत़

गटामध्ये ३६ तर गणात ६८ उमेदवार
कळंब : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ३६ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत़ तर चोराखळी गणातील उमेदवारांच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत १० फेब्रुवारी रोजी अंतीम निर्णय होणार आहे़ नायगाव गटातून राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली तर ईटकूर गटात सेनेत बंडखोरी झाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गटांसाठी आता बहुतांश ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत़ उमेदवारी मागे घेण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांना पक्षातील बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी या नेत्यांना यश आले तर काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्या ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अडचण येणार आहे. ईटकूर गटात सेनेच्या दोन वेळेसच्या जिल्हा परिषद सदस्या पंचफुला मधुकर सावंत यांना सेनेने उमेदवारी नाकारली. मधुकर सावंत हे सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या ठिकाणी रिपाइं (आठवले गट) मधून सेनेत नुकताच प्रवेश केलेले कालिदास सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. पंचफुला सावंत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.
डिकसळ जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार पद्मजा निळकंठ शिंदे यांनीही उमेदवारी मागे घेतली. या गटात आता सेना, राष्ट्रवादी व भाजपा पुरस्कृत उमेदवारांत लढत रंगणार आहे. शिंदे यांची उमेदवारी मागे घेण्यामागे काँग्रेसच्याच एका गटाचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. याव्यतिरिक्त ईटकूर गणातील प्रांजली आडसूळ, मंगरूळ गणातील विद्या जाधव, हासेगाव (केज) गणातील हरिश्चंद्र कुंभार या काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसला आता ईटकूर व डिकसळ गटात तसेच मस्सा (खं), ईटकूर, मंगरूळ, हासेगाव (केज), लोहटा (पूर्व) या पाच गणात उमेदवारच नाहीत.