३५० वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: April 20, 2015 00:30 IST2015-04-20T00:14:48+5:302015-04-20T00:30:26+5:30
संजय कुलकर्णी , जालना शहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे.

३५० वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
संजय कुलकर्णी , जालना
शहराजवळील सिंदखेडराजा मार्गावर असलेल्या वनपरिक्षेत्रातील (उत्तर विभाग) सुमारे ३५० प्राण्यांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. येथील पाणवठे कोरडेच राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महिन्यातून दोनच वेळा वन विभागाकडून टँकरद्वारे पाणी टाकले जात आहे.
जालना शहरातील कन्हैय्यानगर वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत ५० हेक्टर क्षेत्रात असलेल्या या वनपरिक्षेत्रामध्ये मोर, हरीण, काळवीट, नीलगायी, ससे असे सुमारे ३५० प्राणी आहेत. गेल्या तीन-चार वर्षात ५ हेक्टर क्षेत्रात पर्यावरणप्रेमींसाठी वन उद्यान तयार करण्यात आले आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी या परिसरात असलेल्या दोन पाणवठ्यांपैकी एक पाणवठा नेहमीच कोरडा असतो. रविवारी सायंकाळी हा पाणवठा कोरडाच आढळून आला. तर दुसऱ्या पाणवठ्यात पाणी कमी प्रमाणात होते. सध्या उन्हाचा पारा ४१ अंशापर्यंत पोहोचलेला असून उन्हाच्या कडाक्यात पाण्यासाठी वनपरिक्षेत्रातील प्राण्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र दिसून आले. या परिक्षेत्राच्या शेजारी असलेल्या काही शेतांमध्ये प्राणी पाण्याच्या शोधार्थ जात आहेत.
वनपरिक्षेत्रात असलेल्या वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून या ठिकाणी दोन पाणवठे तयार केलेले आहेत. मागील तीन-चार वर्षात या क्षेत्रात एकूण ५० हेक्टरपैकी ५ हेक्टरमध्ये वनउद्यान तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमी दररोज या ठिकाणी विरंगुळा म्हणून येतात. सकाळी व सायंकाळी जॉगींगसाठी नियमितपणे येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पाणवठे कोरडे असल्याचे पाहून काहीजण अधून-मधून टँकरने पाणी आणून तेथे टाकतात. मात्र हे काम वन विभागाकडून नियमितपणे होणे आवश्यक आहे.
मोर, हरीण, काळवीट, नीलगायी यासारख्या वन्यप्राणांची संख्या या वनपरिक्षेत्रात अधिक आहे. पाणवठे अनेकवेळा कोरडे राहत असल्याने या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ परिसरातील शेतांमध्ये आपला मोर्चा वळविल्याचे काही जणांनी सांगितले. पाण्यासाठी प्राण्यांची हेळसांड होत आहे.