३५० अंगणवाड्यांना मिळेना हक्काचे छत !
By Admin | Updated: July 24, 2014 00:12 IST2014-07-24T00:05:10+5:302014-07-24T00:12:12+5:30
उस्मानाबाद : बालकांना पक्का निवारा मिळावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही १४७ अंगणवाड्यांची बांधकामे विविध कारणांमुळे रखडली आहेत.

३५० अंगणवाड्यांना मिळेना हक्काचे छत !
उस्मानाबाद : बालकांना पक्का निवारा मिळावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधीचा निधी दिला जात आहे. मात्र निधी उपलब्ध होऊनही १४७ अंगणवाड्यांची बांधकामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. तर दुसरीकडे जागा उपलब्ध होत नसल्याने २०० अंगणवाड्यांचे इमारत बांधकाम अडचणीत सापडले आहे. एकंदरीत जिल्ह््यातील ३५० अंगणवाड्यांना त्यांच्या हक्काचे छत अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे या गावातील बालकांना समाजमंदिरामध्ये अथवा मंदिरात बसविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
जिल्ह््यामध्ये १० प्रकल्पांतर्गत सुमारे १ हजार ८७६ अंगणवाड्या सुरु आहेत. या अंगणवाड्यांमधून लाखो बालके ज्ञानाचे धडे गिरवत आहे. एकीकडे अंगणवाड्या डिजिटल करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. तर दुसरी हजारो बालकांना बसण्यासाठी पक्की इमारत नाही. उपलब्ध होईल त्या इमारतीमध्ये बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहे. इमारतीची समस्या लक्षात घेऊन मागील दोन-तीन वर्षामध्ये शासनाकडून बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे जवळपास १४७ इमारतींची बांधकामे रखडली आहेत. पाणी नसल्यामुळे काही इमारतीची बांधकामे झाली नाहीत, असे सांगण्यात आले. काही ठिकाणी ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या आहेत. तर काही इमारतीचा निधी आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या जिल्हा बँकेत अडकला आहे. त्यामुळे या १४७ अंगणवाड्यांच्या बालकांना मिळेल त्या इमारतीत बसावे लागत आहे.
दरम्यान, २०० वर गावे अशी आहेत की, जेथे अंगणवाडीसाठी जागा मिळत नाही. गावामधील गावठाण जमिनी बक्कळ असतात. असे असतानाही अंगणवाडीसाठी जागा मिळत ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे. त्यामुळे या मुलांनाही बसण्यासाठी समाजमंदिरे अथवा भाड्याच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे. १४७ अंगणवाड्यांची कामे विविध कारणांमुळे रखडली आहेत. याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
कुपोषणमुक्तीवर परिणाम
शासनाच्या वतीने कुपोषणमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम अंगणवाडीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. मात्र ३५० अंगणवाड्यांना हक्काची इमारत नसल्यामुळे संबंधित अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांना गैरसोयीला तोंड द्यावे लागते. परिणामी त्यांना हे उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविता येत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. याचाच परिणाम कुपोषण मुक्तगाव यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमावर होत असल्याचेही नमूद केले.
लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज
२०० वर गावांमध्ये अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे या गावातील बालकांना भाड्याच्या इमारतीत अथवा समाजमंदिरामध्ये बसून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यानंतर मार्गी लागू शकतो. असे झाल्यास २०० वर गावांमध्ये अंगणवाड्यांच्या इमारती उभा राहू शकतात.