दंत महाविद्यालयांतील ३५ टक्के जागा रिक्त
By Admin | Updated: October 6, 2014 00:44 IST2014-10-06T00:30:11+5:302014-10-06T00:44:01+5:30
बापू सोळुंके, औरंगाबाद राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस प्रथम वर्षासाठी २,५६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

दंत महाविद्यालयांतील ३५ टक्के जागा रिक्त
बापू सोळुंके, औरंगाबाद
राज्यातील १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस प्रथम वर्षासाठी २,५६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. एमबीबीएसनंतर विद्यार्थ्यांचा कल दंत चिकित्साशास्त्र अभ्यासक्रमाकडे (बीडीएस) असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दंतचिकित्साशास्त्र अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी राज्यातील शासकीय आणि खाजगी दंत महाविद्यालयांतील बीडीएस प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या सुमारे ३० ते ३५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळावा, यासाठी दरवर्षी सुमारे दीड लाखांहून अधिक विद्यार्थी सीईटी देतात. यावर्षी मे महिन्यात १ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. सीईटीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आणि बारावी बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे राज्य गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.
या गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना जात प्रवर्गनिहाय प्रवेश देण्यात येतो. त्याप्रमाणे यावर्षीची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. बहुतेक विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस आणि त्यानंतर आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग या क्रमाने अभ्यासक्रमाला पसंती देतात. ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश मिळत नाही ते बीडीएस अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बीडीएस अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थी पाठ फिरवीत असल्याचे दिसून येते.
राज्यातील चार शासकीय दंत महाविद्यालयांत सुमारे साडेचारशे जागा आहेत. मात्र, यावर्षी राज्यातील सर्वच शासकीय दंत महाविद्यालयांतील सुमारे ३० ते ३५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.
गतवर्षीपर्यंत ४० विद्यार्थी क्षमता असलेल्या औरंगाबादेतील शासकीय दंत महाविद्यालयाची प्रवेश क्षमता यावर्षीपासून ५० करण्यात आली. गतवर्षी बीडीएस अभ्यासक्रमासाठी केवळ २३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यावर्षी अथक प्रयत्नानंतर प्रवेश क्षमता १० ने वाढली आहे. प्रवेश क्षमता ५० असूनही केवळ ३३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अशाच प्रकारे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालयांची अवस्था आहे.