विश्वासघाताने उद्योजकाला ३३ लाख ४१ हजारांचा गंडा
By Admin | Updated: July 10, 2016 01:08 IST2016-07-10T00:53:15+5:302016-07-10T01:08:57+5:30
औरंगाबाद : सुरुवातीला प्रामाणिकपणा दाखवून खरेदी केलेल्या कच्च्या मालाचे पैसेही देऊन विश्वास संपादन केला.

विश्वासघाताने उद्योजकाला ३३ लाख ४१ हजारांचा गंडा
औरंगाबाद : सुरुवातीला प्रामाणिकपणा दाखवून खरेदी केलेल्या कच्च्या मालाचे पैसेही देऊन विश्वास संपादन केला. नंतर मात्र, गोड बोलून एकापाठोपाठ माल मागवून त्या मालाचे ३३ लाख ४१ हजार ६७५ रुपये देण्यास टाळाटाळ करून ठाणे येथील तीन जणांनी एका उद्योजकाची फसवणूक केली. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित कोठारी, कपिल शुक्ला, मनीष शहा, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, हर्सूल परिसरातील नंदादीप हौसिंग सोसायटी येथील रहिवासी असलेले दुलाल महावीर महांतो यांचे राहत्या घरीच कार्यालय आहे. ते औषधी तयार करणाऱ्या कंपन्यांना कच्चामाल पुरविण्याचा व्यवसाय करतात. आरोपींची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कल्हेर पाईपलाईन रोडवर परशुराम अपार्टमेंट या पत्त्यावर कोठारी अॅण्ड कंपनी नावाचे कार्यालय आहे. या पत्त्यावर त्यांच्या कंपनीने महांतो यांना औषध निर्माण करणाऱ्या कंपनीसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियम पावडरची आॅर्डर दिली. या आॅर्डरसाठी आरोपीने त्यांना ३ लाख २१ हजार ८९१ रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश तुमच्याकडे तारण म्हणून राहू द्या, असे आरोपीने त्यांना सांगितले होते. या धनादेशामुळे आरोपींनी महांतो यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर १८ मार्च ते ४ जुलै या कालावधीत वेळोवेळी ई-मेलवर आॅर्डर देऊन तब्बल ३३ लाख ४१ हजार ६७५ रुपयांचा माल मागवून घेतला. माल घेतल्यानंतर आरोपींनी सुरुवातीला त्यांना आज पैसे पाठवतो, उद्या पाठवतो असे केले. काही दिवसांपूर्वी तर महांतो यांनी पैशाची मागणी करताच आरोपीने त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींनी आपला विश्वासघात करून फसवणूक केल्याचे समजल्याने त्यांनी हर्सूल पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
धनादेशही झाला बाऊन्स
आरोपींनी महांतो यांना दिलेला ३ लाख २१ हजार ८९१ रुपयांचा धनादेश न वटता बँकेतून परत आला आहे. आरोपींच्या खात्यावर पैसे नसल्याने हा धनादेश न वटता परत आल्याचे तपास अधिकारी जवखेडे यांनी सांगितले. महांतो आणि आरोपी हे एकदाही एकमेकांना भेटले नाही. काही दिवसांपूर्वी महांतो हे आरोपीच्या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र, तेथेही त्यांची भेट झाली नाही.