पीक विम्याचे ३२ कोटी वाटप
By Admin | Updated: July 7, 2014 00:14 IST2014-07-06T23:30:09+5:302014-07-07T00:14:59+5:30
जालना : जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना ३२ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.

पीक विम्याचे ३२ कोटी वाटप
जालना : जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना ३२ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. साडेतीन लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ६० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.
यावर्षी पाऊस लांबल्याने खरीप पेरण्या पूर्णत: खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पीक विम्याकडे मोठ्या प्रमाणात वळणार असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाचे जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांपैकी फक्त ६० हजार ९७ शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला होता. पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३२ कोटी ७७ लाख रूपयाचा विमा मंजूर होऊन वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी कृषी विभागातर्फे होत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना २ हजार ८२३ कोटी रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यात जालना जिल्हाला ३२ कोटी ७७ लाख पीक विमा भरपाई मिळाली असल्याचे कृषी अधीक्षक उमेश घाटके यांनी सांगितले. राष्ट्रीय पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभाग घेता यावा यासाठी कृषी विभागाने राज्य स्तरावर लोकप्रतिनिधी आणि प्रगतीशिल शेतकरी याचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार पीक विमा योजनेत जोखीम स्तर उंचावणे, पीक कापणी, काटेकोर पध्दतीने राबविणे, गारपीटग्रस्तांच्या वैयक्तिक पंचनाम्याद्वारे नुकसान भरपाई देणे, असे बदल वेळोवेळी करण्यात आले होते. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्य शासनातर्फे मोठी जनजागृती मोहीमही राबविण्यात आली होती. २०१२-१४ या वर्षात खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील तालुकानिहाय वाटप करण्यात आले ज्यामध्ये अंबड तालुक्याला ९ कोटी ८५ लाख, बदनापूर २ कोटी ४८ लाख, भोकरदन ४४ लाख , घनसावंगी ८ कोटी २४ लाख, जालना ७ कोटी २४ लाख, मंठा २ कोटी १५ लाख परतूरला १ कोटी ८५ लाख असे एकूण ३२ कोटी ७७ लाख रूपये पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
चालू खरीप हंगामासाठी पीक विम्यासंदर्भात कोणत्याही अधिकृत सूचना, पत्र शासनाकडून आम्हाला मिळाले नाही. यंदा पाऊसच न पडल्याने पीक विमा काढण्यात आला नसल्याची माहिती कृषी अधीक्षक घाटगे यांनी दिली.
पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा...
जिल्हा कृषी अधीक्षक यू.आर.घाटगे म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. खरीप पिकांसाठी पीक विमा महत्व पूर्ण आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. गत वर्षी फक्त ६० हजार ९७ शेतकऱ्यांनीच विमा उतरविला होता. ही संख्या अतिशय अत्यल्प आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी विमा काढणे गरजेचे आहे.