३०४ शिक्षकांच्या झटक्यात बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:26 IST2017-09-24T00:26:16+5:302017-09-24T00:26:16+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणानुसार जिल्ह्यातील विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील ३०४ शिक्षकांच्या खो बदल्या झाल्या असून या संदर्भातील पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिक्षकांची धावपळ सुरु असल्याचे पहावयास मिळाले.

३०४ शिक्षकांच्या झटक्यात बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणानुसार जिल्ह्यातील विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील ३०४ शिक्षकांच्या खो बदल्या झाल्या असून या संदर्भातील पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिक्षकांची धावपळ सुरु असल्याचे पहावयास मिळाले.
राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार बदल्यांचे धोरण निश्चित केले होते. त्यामध्ये अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा, शिक्षक, सक्षम प्राधिकारी, बदल्यांचे अधिकारप्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग शिक्षक भाग १, भाग २, बदलीस पात्र शिक्षक आदी बाबींचा समावेश करण्यात आला होता. या निर्णयात सुधारणा करुन १२ सप्टेंबर रोजी वेगळा आदेश काढण्यात आला. त्यामध्ये २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात फक्त विशेष संवर्ग भाग १ व भाग २, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, संवर्ग १, २ च्या बदल्यांमुळे विस्थापित होणाºया शिक्षकांच्या पदस्थापना, रिक्त जागांचे समानीकरण याच प्रक्रियेनुसार बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. संवर्ग १ मध्ये शासनाने पक्षाघाताने आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच मूत्रिपिंड असलेले, डायलेसीस सुरु असलेले, कर्करोगाने आजारी असलेले कर्मचारी, आजी-माजी सैनिक, अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी, विधवा, कुमारी कर्मचारी, परित्यक्ता, घटस्फोटित महिला व वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेल्या महिला कर्मचाºयांचा समावेश आहे. विशेष संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण (सध्या जर दोघांच्या नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी.अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल) यांचा समावेश आहे.
या संवर्गामधील ३०४ शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने २२ सप्टेंबर रोजी यादी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ४३, जिंतूर तालुक्यातील १५, मानवत तालुक्यातील ५, पालम तालुक्यातील १७, परभणी तालुक्यातील १३५, पाथरी तालुक्यातील १०, पूर्णा तालुक्यातील १६, सेलू तालुक्यातील १९, सोनपेठ तालुक्यातील ८, परभणी शहरातील ३ व जिल्ह्यातील उर्दू विभागातील २६ शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण दिले जाणार आहे. यासाठी त्यांना २० गावांचे पर्याय द्यायचे आहेत. त्या २० गावांमध्ये त्यांच्या इच्छेनुसार त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत.
संवर्ग १ व संवर्ग २ मधील शिक्षकांच्या बदलीनंतर विस्थापित होणाºया शिक्षकांच्या जागेवर संवर्ग ४ च्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या अनुषंगाने संबंधित शिक्षकांना पोर्टलवर माहिती भरावी लागणार आहे. शुक्रवारी या संदर्भातील यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली होती. अनेक शिक्षक इंटरनेट कॅफेवर फार्म भरताना दिसून आले.