जिल्ह्यात ३०० टँकर !
By Admin | Updated: March 30, 2016 00:44 IST2016-03-30T00:35:08+5:302016-03-30T00:44:43+5:30
उस्मानाबाद : तीन-चार वर्षांपासून सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाभरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात ३०० टँकर !
उस्मानाबाद : तीन-चार वर्षांपासून सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाभरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासोबतच चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून टँकरसोबत जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्तांची तहान भागविली जात आहे. परंतु, सदरील उपाययोजनाही तोकड्या पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने त्याच गतीने जलस्त्रोतही कोरडे पडू लागले आहेत. परिणामी टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला जिल्हाभरात तब्बल ३०० टँकर सुरू असून अधिग्रहणांची संख्याही १ हजार १ हजार १६८ वर जावून ठेपली आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांसोबतच पाझर तलावांच्या घशाला कोरड निर्माण झाली आहे. तसेच भू-जल पातळीही फारशी उंचावलेली नाही. त्यामुळे जसजशी उन्हाची दाहकता वाढू लागली आहे, त्याप्रमाणे विहीर, बोअर झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. एकेका गावामध्ये टँकर भरण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाच ते दहा किलोमीटर दूर जावून पाणी आणावे लागत आहे. परिणामी टँकरसोबतच जलस्त्रोत अधिग्रहणांची मागणी वाढू लागली आहे.
सध्या सर्वाधिक भीषण टंचाई उस्मानाबाद तालुक्यात असून सुमारे ६३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. उस्मानाबादनंतर भूम तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असून तब्बल ५५ टँकर सुरू आहेत. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची ५० टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. उरमाग तालुक्यातही टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत झपाट्याने भर पडू लागली आहे. आजघडीला ४१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाशी आणि परंडा तालुक्यातही टंचाई तीव्र रूप धारण करू लागली आहे. या दोन्ही तालुक्यांत मिळून ४८ टँकर सुरू आहेत. तुळजापूर तालुक्यातही २० टँकर सुरू आहेत. तर लोहारा तालुक्यामध्ये ५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागामध्ये एकूण २८२ टँकर सुरू आहेत. ही संख्या आणखी वाढेल, प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)