३०० गायकांनी गाजविली ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा
By Admin | Updated: November 3, 2016 01:34 IST2016-11-03T01:21:59+5:302016-11-03T01:34:06+5:30
औरंगाबाद : ‘शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीत, सुगम गीत, चित्रपट गीत’ ही सर्व प्रकारची गाणी ताकदीने गाऊन ३०० हौशी कलाकारांनी ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा गाजविली.

३०० गायकांनी गाजविली ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा
औरंगाबाद : ‘शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावगीत, सुगम गीत, चित्रपट गीत’ ही सर्व प्रकारची गाणी ताकदीने गाऊन ३०० हौशी कलाकारांनी ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा गाजविली. हौशी असले तरीही अनेक जण पट्टीचे गायक निघाल्याने अंतिम स्पर्धेसाठी ३३ गायकांची निवड करणे ही परीक्षकांसाठी परीक्षाच ठरली.
मारवाडी समाजातील १७ पोटजातीतील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सकल मारवाडी युवा मंचतर्फे २४ ते २६ आॅक्टोबरदरम्यान ‘मारवाडी आयडॉल’ स्पर्धा घेण्यात आली. तापडिया नाट्यमंदिरात आयोजित स्पर्धेत समाजातील उदयोन्मुख गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते. या स्पर्धेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तीन दिवसांत ३०० गायकांनी आपल्या आवाजाची मोहिनी समाजबांधवांना घातली. व्यावसायिक गायकांच्या तोडीस तोड गाणे गाऊन हौशी गायकांनी ‘हम भी कुछ कम नही’ हेच दाखविले. ३०० गायकांमधून उपांत्य फेरीसाठी ७७ गायकांची निवड करण्यात आली. २६ रोजी उपांत्य फेरीला सकाळी सुरुवात झाली. रात्री १२ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली. यानंतर परीक्षक पं. विश्वनाथ दाशरथे, शांतीभूषण चारठाणकर व राजश्री ओक यांना अंतिम स्पर्धेसाठी २५गायकांची निवड करायची होती. गायकांची निवड करणे खऱ्या अर्थाने परीक्षक असलेल्या संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांचीही परीक्षाच ठरली. त्यांनी अंतिम स्पर्धेसाठी ३३ जणांची निवड केली. यामध्ये १४ वर्षांखालील ९ स्पर्धक, १५ ते ४९ वयोगटातील १८ तर ५० वर्षांवरील ६ स्पर्धक, अशा ३३ गायकांची निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख आशिष सोमाणी, आशिष मेहता, नीलेश पहाडे, नरेश मोर, अनुप काबरा, नितीन भक्कड, विकास पाटणी, रवी रांदड आदी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.