३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा
By Admin | Updated: January 31, 2017 00:26 IST2017-01-31T00:25:45+5:302017-01-31T00:26:43+5:30
जालना :जिल्ह्यातील तब्बल ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा
जालना : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती २०१६ वर्ष संपून गेले तरी शिष्यवृत्ती मिळालेली नाही. जिल्ह्यातील तब्बल ३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आॅक्टोबर २०१६ मध्ये प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविला. परंतु अद्यापही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यासाठी मॅट्रीकपूर्व आणि इतर शिष्यवृत्ती देण्यात येते. काही दिवसांपूर्वी शासनाने शिष्यवृत्तीचे सर्व प्रक्रीया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांचे प्रस्ताव यापूर्वीच समाजकल्याण विभागाला पाठविण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती वाटपासाठी जि.प. समाजकल्याण विभागाने ५ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवून एक वर्ष उलटले आहे. परंतु अद्यापही समाजकल्याण विभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाले नसल्याने जिल्ह्यातील तीस हजार विद्यार्थी एक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत विद्यार्थी समाजकल्याण विभागात शिष्यवृत्ती मिळावी यासाठी खेटे घालत आहेत.
दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ३७५ रूपये परीक्षा शुल्क, इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले ६०० रूपये शिष्यवृत्ती आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ११०० रूपये ५ ते ७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती ५०० रूपये आणि इयत्ता ८ ते १० विद्यार्थ्यांना १ हजार रूपये तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्यांच्या पाल्यांना १८५० वार्षिक शिष्यवृत्ती तसेच इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्यांना भारत सरकारची मॅट्रीकपूर्व २२५० अशी शिष्यवृत्ती देण्यात येते. परंतु सलग दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. २०१५ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना मिळाली नाही. याविषयी जि.प. समाजकल्याण विभागाचे कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की २०१५ चे वर्षात शासनाला शिष्यवृत्तीसाठी चार कोटी रूपये मागितले होते. त्यापैकी शासनाकडून २४ लाख रूपये प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटप केले जात आहे.