३० टक्के पाणी

By Admin | Updated: May 29, 2014 00:21 IST2014-05-29T00:19:15+5:302014-05-29T00:21:29+5:30

परभणी : उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणातही यावर्षी जिल्ह्यात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील १० ते १५ वर्षांच्या तुलनेत अशी परिस्थिती निर्माण झाली

30 percent water | ३० टक्के पाणी

३० टक्के पाणी

परभणी : उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणातही यावर्षी जिल्ह्यात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील १० ते १५ वर्षांच्या तुलनेत अशी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील नागरिकांची पाणीटंचाईपासून मुक्तता झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाटते. पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता उन्हाळा सुरु होण्यापूर्वी पाण्याचे नियोजन केले जाते. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वरचेवर वाढत जाते आणि उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात चातकासारखी पावसाची वाट पाहिली जाते. त्यामुळे पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याची भावना जिल्हावासियांची झालेली आहे. परंतु, हे वर्ष याला अपवाद ठरले. जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवली नाही. काही गावांमध्ये पाण्याची समस्या असेलही. परंतु, ती पाणी नसल्याने नव्हे, तर नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे काही भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. गतवर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे आणि सिंचन तलाव पाण्याने डबडबले होते. येलदरीसारखे मोठे धरणही १०० टक्के भरले होते. तसेच छोटे-मोठे तलाव, तळे, विहिरी, बंधारेदेखील पाण्याने भरलेले असल्यामुळे यावर्षी पाणीटंचाईने धूम ठोकली होती. जलस्त्रोतांमध्ये पाणी असल्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी देखील अल्पशी घटली. विहिरी आणि हातपंपाना अजूनही पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्तता मिळाली. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातील करपरा आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांत मिळून ३७ टक्के पाणीसाठा आहे. करपरा प्रकल्पामध्ये ६.४० दलघमी पाणी आहे. तर मासोळी प्रकल्पात ४७ टक्के म्हणजे १२.७ दलघमी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी या दोन्ही प्रकल्पात मिळून केवळ १२ टक्के पाणी शिल्लक होते. जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत. या लघूप्रकल्पामध्ये १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मागील वर्षी याच दिवसांत केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चार प्रकल्प जोत्याखाली मध्यम आणि लघूप्रकल्पांपैकी चार लघूप्रकल्पामधील पाणी जोत्याखाली आहे. तर १२ लघूप्रकल्पांमध्ये ० ते २५ टक्के, चार प्रकल्पामध्ये २६ ते ५० टक्के आणि २ प्रकल्पामध्ये ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

Web Title: 30 percent water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.