जायकवाडी जलवाहिनीतून ३० टक्के गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:37 IST2016-03-29T00:26:07+5:302016-03-29T00:37:24+5:30
जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनीतून दिवसाकाठी साधारणपणे ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी गळती होत असून, या दुरूस्तीसाठी पालिकेचे लाखो

जायकवाडी जलवाहिनीतून ३० टक्के गळती
जालना : जायकवाडी ते जालना जलवाहिनीतून दिवसाकाठी साधारणपणे ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी गळती होत असून, या दुरूस्तीसाठी पालिकेचे लाखो रूपये खर्च होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
जायकवाडी ते जालना ही योजना तीन वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली. या जलवाहिनीत १७० व्हॉल्व्ह आहेत. त्यामधून ८० ते ९० व्हॉल्व्ह मधून २४ तास पाणी गळती होत असते. हे चित्र तीन वर्षांपासून सुरू आहे. ५० झोनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सर्वच झोनमध्ये गळती होत आहे. गळतीचे प्रमाण ३० टक्के आहे. पालिका गळती थांबविण्यासाठी महिन्याला १४. ३० लक्ष रूपये खर्च करते. पाणी वितरणामध्ये १ कोटी ६ लक्ष रूपयांचा खर्च दाखवित असल्याचा आरोप चिन्नदोरे यांनी केला. एकूणच या गळतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. शहरावासियांचे पैसे वाया जात आहे. गत दोन ते तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने लाखो रूपये पाण्यात जात आहेत. पाण्याची अडचण दाखवून पालिका टँकर तसेच विंधन विहिरींसाठी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करणार आहे.
एकूणच जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वार्षिक नळपट्टी २७०० रूपये करण्यात आली आहे तो ठरावही रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)