३० मोबाईल टॉवर्स आज होणार कनेक्ट
By Admin | Updated: July 21, 2014 00:34 IST2014-07-21T00:03:19+5:302014-07-21T00:34:55+5:30
औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे ९ कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे ६१ मोबाईल टॉवर्सला सील करून ते ताब्यात घेतले होते.

३० मोबाईल टॉवर्स आज होणार कनेक्ट
औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे ९ कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे ६१ मोबाईल टॉवर्सला सील करून ते ताब्यात घेतले होते. त्यातील ३० टॉवर्सचे उद्या २१ जुलै रोजी सील काढण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. मनपा तिजोरीत ३ कोटींची भर पडली असून, ५ ते ६ कोटींपर्यंतच हा आकडा जाईल, असेही झनझन यांनी सांगितले.
तीन दिवसांपासून बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क जाम झालेले आहे. ३० टॉवर सुरू होणार असल्यामुळे मोबाईल ग्राहकांची जाम नेटवर्कमधून सुटका होणार आहे.
वोडाफोन, व्होम, टाटा, एअरटेल या कंपन्यांचे सील करण्यात आलेले टॉवर उद्या काढण्यात येणार आहेत. ज्या टॉवर कंपन्यांनी कर भरला आहे, त्यांच्या टॉवरचे सील काढण्यात येणार आहे. उर्वरित टॉवरकडून कर मिळेपर्यंत सील असतील, असे अग्निशमन तथा करसंकलन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले.
आयुक्तांच्या परवानगीने निर्णय
अनधिकृत वसाहतींमधील अनधिकृत इमारतींवर अनधिकृत टॉवर्स उभारण्यात आले आहेत. ६१ टॉवर सील केले असून, ३० टॉवरचे सील आयुक्तांच्या परवानगीनेच काढण्यात येणार आहेत, असे अधिकारी झनझन यांनी सांगितले. मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी धनादेश जमा करीत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते प्रमाण वाढेल, असा दावा त्यांनी केला. शहरात एकूण ३७५ टॉवर्स असून, त्यामध्ये ४७ टॉवर्स अधिकृत आहेत. ३२८ पैकी ६१ टॉवर्सची यंत्रणा मनपाने ताब्यात घेतली होती. त्यातील ३० टॉवर २१ जुलैपासून सुरू होणार आहेत.
मोबाईल टॉवरसाठी सर्व्हे
शहरातील अधिकृत आणि अनधिकृत मोबाईल टॉवर्सचा सर्व्हे मनपा नगररचना विभाग करणार असून, १० दिवसांत त्यांची यादी तयार होणार आहे. त्यानंतर अधिकृत आणि अनधिकृत अशा टॉवरचे वर्गीकरण केले जाणार आहे. अधिकृत टॉवरला शासनाच्या नव्या नियमाने कर लावला जाईल, तर अनधिकृत टॉवरवर दंडात्मक कारवाई करून कर आकारण्यात येणार आहे.