पोळ्यासाठी ३० लाखांवर नारळांची आवक

By Admin | Updated: September 1, 2016 01:03 IST2016-09-01T00:16:48+5:302016-09-01T01:03:50+5:30

राजेश खराडे , बीड वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा! बुधवारी खांदेमळणी असून गुरुवारी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे

30 lakhs of coconut for the hive | पोळ्यासाठी ३० लाखांवर नारळांची आवक

पोळ्यासाठी ३० लाखांवर नारळांची आवक



राजेश खराडे , बीड
वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबराब राबणाऱ्या सर्जा- राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा! बुधवारी खांदेमळणी असून गुरुवारी हा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे. बीडमध्ये महिनाभराच्या विश्रांतीनंतर पोळ्याच्या दोन दिवस आधी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांत पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठही फुलली असून बैलांना सजविण्यासाठी लागणाऱ्या साजश्रृंगार खरेदीची लगबग सुरु आहे. खास सणानिमित्त ३० लाख नारळाची आवक झाली आहे.
सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा पीक चांगले आले. मात्र, महिन्यापासून वरुणराजा रुसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा नैराश्येचे वातावरण निर्माण होऊ लागले होते. दोन दिवसांपूर्वीच पावसाने जोरदार ‘कमबॅक’ केले. त्यामुळे निराशा झटकून शेतकरी पोळा धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी उत्साहाने बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत. बीडमधील मोंढ्यात बुधवारी खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी लाडक्या सर्जा- राजासाठी कासरा, सर, मोरखी, वेसन, झूल, बाशिंग खरेदी करत होते. पोळ्यादिवशी बैलांना नवरदेवाप्रमाणे सजवून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पुरणपोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो.
यंदा बैलांच्या पायात घालण्यासाठी घुंगराचा चाळ व शिंगावर लावण्याकरता तुरा सर हा नवीन साज बाजारात आला आहे. साजसाहित्याच्या किंमती स्थिर असून पाऊस झाल्यामुळे शेतकरी जोमाने खरेदी करत असल्याचे विक्रेते विवेक चरखा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त
पोळ्यादिवशी मिरवणुकीदरम्यान वाद, विवाद होतात. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. राज्य राखीव दलाची एक तुकडी मागविली असून स्थानिक पोलीस बंदोबस्तावर असतील. त्यांच्या दिमतीला ३०० पुरुष व १०० महिला होमगार्ड कर्तव्यावर राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. संवेदनशील गावांत पोलिसांची जादा कुमक तैनात राहणार आहे. पोळा सण शांततेत साजरा होईल, यादृष्टीने सर्वतोपरी उपाय केल्याचे नरवाडे म्हणाले.
पोळ्यादिवशी काळ्याआईसह शिवारातील साऱ्या देवदेवतांची पूजाअर्चा केली जाते. त्यासाठी नारळ खरेदी मोठ्या प्रमाणावर असते. तामिळनाडू, आंध्रप्रदेशातून यंदा ३० लाखांवर नारळांची आवक झाली असून किंमतीत निम्म्याने घट आहे. गतवर्षी १२०० ते १४०० रुपयांपर्यंत गेलेले दर यंदा ५०० ते ७०० रुपये शेकडा इथपर्यंत गडगडले आहेत. बीडमधून औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही नारळाची होलसेल विक्री होते, असे व्यापारी केदारनाथ झंवर यांनी सांगितले.

Web Title: 30 lakhs of coconut for the hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.