छत्रपती संभाजीनगर : ३०-३० घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार संतोष ऊर्फ सचिन राठोड याचा जिवलग मित्र सुदाम मानसिंग चव्हाण (४०, रा. निलजगाव, बिडकीन) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने त्याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
नोव्हेंबर, २०२१ मध्ये मराठवाड्याला हादरवणारा हा घोटाळा उघडकीस आला. दिल्ली मुंबई कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहणात स्थानिकांना कोट्यवधी रुपये मिळाले. अशा शेतकऱ्यांना २५-३० टक्क्यांचे आमिष दाखवून राठोडने गुंतवणुकीचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपये उकळून पसार झाला. २०२१ मध्ये पहिल्यांदा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली. मूळ तक्रारदारांनी जबाब मागे घेतल्याने त्याची कारागृहातून सुटका झाली. ६० तक्रारदारांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात राठोडकडून झालेल्या फसवणुकीबाबत नव्याने तक्रार केली. आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला.
फर्मच्या नावे पैसे वळतेसुदाम व सचिन हे जिवलग मित्र आहेत. सुदामचे परिसरात राजकीय, सामाजिक वर्चस्व होते. त्यामुळे त्याच्या म्हणण्यावर अनेकांनी सचिनकडे कोट्यवधी रुपये गुंतवले. सुदामची सामतदादा इंटरप्राईजेस अँड मल्टिसर्व्हिसेस नावाची फर्म आहे. त्या फर्मच्या बँक खात्यावर सचिनने ११ कोटी ४३ लाख रु. पाठवले. पंजाब नॅशनल बँक खात्यावर ७ कोटी १० लाख ९१ हजार रुपये असे एकूण १८ कोटी ५३ लाख ९१ हजार रुपये पाठवले. आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली असून पंकज प्रल्हाद जाधव नुकताच जामिनावर सुटला. सुहास पंडित चव्हाण, कृष्णा एकनाथ राठोड, साहेबराव अप्पा राठोड, आलासिंग शामराव राठोड हे कारागृहात आहेत.
न्यायालय परिसरातच बेड्यापोलिस अनेक दिवसांपासून सुदामच्या शोधात होते. एका धनादेश अनादरित प्रकरणात तो सोमवारी न्यायालयात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांना मिळाली. त्यावरून कामठे, मुख्य अंमलदार संदीप जाधव, प्रभाकर राऊत, सखाराम मोरे यांनी दुपारी न्यायालय परिसरात सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने १८ कोटींचे काय केले, अन्य आरोपींच्या कुठल्या खात्यावर पैसे गेलेत, याचा पोलिस तपास करीत आहेत.