३ लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: December 28, 2015 23:49 IST2015-12-28T23:34:26+5:302015-12-28T23:49:39+5:30
ळूज महानगर : अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून रोख अडीच लाख रुपये व ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा तीन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना वाळूज येथे रविवारी रात्री घडली.

३ लाखांचा ऐवज लंपास
ळूज महानगर : अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून रोख अडीच लाख रुपये व ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा तीन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना वाळूज येथे रविवारी रात्री घडली. संतोष वडाळे (३८) हे आई अरुणाबाई, पत्नी सोनाली, मुलगा सोहम व मुलगी आयुषी यांच्यासह वाळूजच्या श्रद्धा कॉलनीत वास्तव्यास आहेत. एका कंपनीचे वितरक म्हणून ते काम करतात. ग्राहकांकडून जमा झालेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करीत असतात. २४ डिसेंबरला ईद-ए-मिलाद व २५ ला ख्रिसमसमुळे बँकेला सुटी असल्याने ग्राहकांकडून जमा झालेले अडीच लाख रुपये त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. २६ डिसेंबरला रात्री १० च्या सुमारास वडाळे यांच्या सासू लता लव्हारकर, मेव्हणे जयेश आणि राकेश हे त्यांना भेटण्यासाठी वाळूजला आले होते. दुसऱ्या दिवशी राकेशच्या सोयरिकीनिमित्त वडाळे व लव्हारकर कुटुंबाने बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी नऊ वाजता ते मेहकरला रवाना झाले. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास गणेश तुपे (रा. जोगेश्वरी) याने संतोष वडाळे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. कंपनीच्या कामानिमित्त माझा भाऊ तुमच्या घरी गेला होता. मात्र तुमच्या घराचा दरवाजा उघडा असून, घरात कुणीही नसल्याचे तसेच विजेचे सर्व दिवे सुरूअसून सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे सांगितले. घाबरलेले वडाळे यांनी तातडीने परतण्याचा निर्णय घेतला. रात्री दहाच्या सुमारास कुटुंबासह घरी परत आले असता, मुख्य दरवाजा व घर उघडे असल्याचे दिसून आले. देवघरातील कपाटाची पाहणी केली असता ग्राहकांकडून जमा झालेले अडीच लाख रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कपाटात ठेवलेले अडीच तोळ्याचे ५० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट व ६ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठीही चोरीला गेल्याचे दिसून आले. वडाळे यांनी वाळूज पोलिसांत चोरीची तक्रार दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एस. एन. बहुरे करीत आहेत.