३ लाख ग्राहकांचे अनुदान रखडणार
By Admin | Updated: December 31, 2014 01:06 IST2014-12-31T00:17:46+5:302014-12-31T01:06:37+5:30
औरंगाबाद : केंद्र सरकारने गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात गॅसचे अनुदान थेट जमा करण्याची सुधारित योजना सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना १ जानेवारीपासून सुरू होत आहे

३ लाख ग्राहकांचे अनुदान रखडणार
औरंगाबाद : केंद्र सरकारने गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात गॅसचे अनुदान थेट जमा करण्याची सुधारित योजना सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना १ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र, जिल्ह्यातील ३ लाख गॅस ग्राहकांनी अद्याप आधार कार्ड आणि बँक खाते लिंक न केल्याने त्यांचे अनुदान रखडणार आहे.
गॅसचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्राहकांनी आधार कार्ड व बँकेत खाते न काढल्याने ही योजना रखडत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या गॅसधारकांकडे आधार कार्ड व बँक खाते उपलब्ध आहे, त्या ग्राहकांनी आधार कार्ड व बँक खात्याची झेरॉक्स प्रत संबंधित गॅस एजन्सीकडे दाखल करायची आहे. जिल्ह्यात ५ लाख ४५ हजार गॅस ग्राहक आहेत. त्यांचे आधार कार्ड व बँक खाते लिंक करण्याचे काम ४२ वितरकांमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. यापैकी ४५ टक्के ग्राहकांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. १ जानेवारीपासून त्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, ५५ टक्के ग्राहक असे आहेत की, त्यांनी अजूनही आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स दिलेली नाही. ते जोपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार नाही. यासंदर्भात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.चे विक्री अधिकारी चंद्रप्रताप राजावत यांनी सांगितले की, जिल्ह्यात अद्याप निम्म्याहून अधिक ग्राहकांनी बँकेची लिंक न दिल्याने त्यांचे अनुदान बँकेत जमा होण्यास अडचणी निर्माण होतील. यासाठी लवकरात लवकर ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सीत जाऊन आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देऊन आपले बँक खाते लिंक करावे. गॅस वितरक सुनीत आठल्ये यांनी सांगितले की, १ जानेवारीपासून केंद्र सरकार गॅसधारकांच्या खात्यात थेट अनुदान जमा करणार आहे. पहिल्या महिन्यात गॅसधारकांच्या खात्यात अॅडव्हान्स जमा होणार आहे व नंतर सबसिडी जमा होईल. काही ग्राहकांनी आधार कार्ड काढले नाही, यामुळे त्यांचे अनुदान रखडू शकते.