३ कोटींच्या एलईडीनी रस्ते उजळणार
By Admin | Updated: August 31, 2014 01:10 IST2014-08-31T00:55:14+5:302014-08-31T01:10:25+5:30
लातूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बहुुतांश पथदिवे बंद असल्याची ओरड असताना शहरातील मुख्य रस्त्यांवर ३ कोटी १४ लाख १९२ रूपये खर्च करून नव्याने ट्युबलर पोल उभे करून एलईडी बसविण्यात येणार आहे़

३ कोटींच्या एलईडीनी रस्ते उजळणार
लातूर : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बहुुतांश पथदिवे बंद असल्याची ओरड असताना शहरातील मुख्य रस्त्यांवर ३ कोटी १४ लाख १९२ रूपये खर्च करून नव्याने ट्युबलर पोल उभे करून एलईडी बसविण्यात येणार आहे़ ३ कोटींच्या एलईडी पथदिव्यांनी शहर उजळणार आहे़ शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी आलेल्या निविदेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे़ शिवाय, १३३ कोटी रूपयांच्या विकासकामांसाठी तांत्रिक सल्लागार सेवा पुरविण्याबाबत आलेल्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे़
लातूर शहरातील मिनी मार्केट राजस्थान शाळा चौक ते पीव्हीआर चौक (नवीन चौपदरी रस्ता), उषाकिरण पेट्रोलपंप ते पीव्हीआर चौक, शांताई हॉटेल ते नवीन रेणापूर नाका, विवेकानंद चौक ते नवीन नांदेड नाका, विवेकानंद चौक ते बाभळगाव नाका चौक या रस्त्यावर नवीन पोल उभे करण्यात येणार आहेत़ या पोलवर एलईडी बसविण्यात येणार आहे़ या कामासाठी मनपाने निविदा मागविल्या होत्या़ २४ आॅगस्टपर्यंत आलेल्या ४ निविदांपैकी आऱआऱएन्टरप्रायजेस, दत्तकृपा विद्युतकाम औद्योगिक सहकारी सोसायटी,विष्णुप्रेम इलेक्ट्रिकल्स यांच्या कागदपत्र तपासणीत तीन निविदा पात्र ठरल्या होत्या़ अंदाजपत्रकाच्या दरानुसार दत्तकृपा विद्युतकाम औ़सह सोसायटी, लातूर यांच्या अंदापत्रकाच्या दरापेक्षा ५ टक्के सर्वात कमी दर आल्याने स्थायी समितीने या निविदेस मंजुरी दिली आहे़ यातून आणखी दर कमी करण्यासाठी आयुक्तांनी संबंधित कंत्राटदारास समक्ष बोलावून ०़२५ टक्के कमी करून घेतले़ त्यामुळे सदर कंत्राटदाराने ५़२५ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे़ निविदा मंजुरीचा ठराव अजगर पटेल यांनी मांडला़ रवी सुडे यांनी अनुमोदन दिले़ त्यानंतर स्थायी समितीचे सभापती अख्तर शेख यांनी सदरील निविदेस मंजुरी देण्यात आल्याचे जाहिर केले़ त्याचबरोबर महापालिका अंतर्गत विविध विकास कामांकरिता सल्लागार सेवा पुरविण्यासाठी आलेल्या प्राप्त निविदांपैकी फोरट्रेस संस्थेच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे़
अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अख्तर शेख होते़ आयुक्त सुधाकर तेलंग, सहाय्यक आयुक्त प्रदिप ठेंगळ, वसुधा फड, माजी सभापती राम कोंबडे, केशरबाई महापुरे, आशाताई स्वामी, राजा मणियार, कैलास कांबळे, नवनाथ आल्टे, पप्पू देशमुख, नगरअभियंता केंद्रे, अभियंता एस़एम़शिंदे, नगरसचिव ओमप्रकाश मुतंगे, रमाकांत पिडगे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते़
एलईडी पथदिवे उभारण्यासाठी कोणता निधी देणार असा सवाल शैलेश स्वामी यांनी उपस्थित केला असता आयुक्तांनी १३ व्या वित्त आयोगातून हा खर्च करणार असल्याचे सांगितले़ जिथे डिव्हायडर नाही तिथे पोल कसे उभारणार असा प्रश्न रवी यांनी उपस्थित केला़ रूपाली साळुंके म्हणाल्या, एलईडी बसविल्यावर त्याचे मेंटनेन्स करणार कोण, यावर आयुक्तांनी पाच वर्षांची वारंटी कंत्राटराने दिल्याचे सांगितले़