लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : शहरातील रजाळवाडी पाझर तलावावर पोहायला गेलेल्या तीन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मयत तिन्ही मुले शहरातील इदगाह परिसरातील अब्दालशहानगर, स्नेहनगर या वस्तीतील रहिवासी असून, यात दोन सख्ख्या चुलत भावांचा समावेश आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सोफियानखान युसूफखान पठाण (१२), मोहंमदखान उमरखान पठाण (१३), तालेबखान असीफखान पठाण (१४), असे बुडून मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील स्नेहनगर, अब्दालशहानगर परिसरातील मोहंमदखान पठाण, तालेबखान पठाण हे दोघे चुलत भाऊ व त्यांच्याच घराशेजारी राहणारा सोफियानखान पठाण हे तिघे मंगळवारी (दि.१०) दुपारी २ वाजेपासून घरातून बाहेर पडले होते; मात्र तिघेही सायंकाळपर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी घराच्या आजूबाजूला, तसेच सिल्लोडमध्ये बराच शोध घेतला. तरीही ते मिळून आले नाहीत. यानंतर कुटुंबियांनी शहर पोलीस ठाणे गाठून तिन्ही मुले गायब झाल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनीही तिघांचा शोध सुरू केला होता.दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजता शहरातील रजाळवाडी पाझर तलावावर अज्ञात तीन मुलांचे प्रेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, पोनि. भगीरथ देशमुख, पोउनि. शैलेश जोगदंड, नगरसेवक सुनील मिरकर, कमलेश कटारिया यांनी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या तिघांचेही प्रेत पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखलकेले.तिन्ही मुलांचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत तिघांचा शहरातील फकिरी कब्रस्तानमध्ये रात्री उशिरा दफनविधी करण्यात आला. एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरातील तिन्ही मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठून मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही मुलांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. यापक्ररणी सिल्लोड शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिल्लोडमध्ये तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:45 IST
शहरातील रजाळवाडी पाझर तलावावर पोहायला गेलेल्या तीन किशोरवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
सिल्लोडमध्ये तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू
ठळक मुद्देदुर्घटना : पठाण कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर