छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग आराखडा नगरविकास विभागाला दोन दिवसांपूर्वी सादर करण्यात आला. ११५ नगरसेवक निवडण्यासाठी २९ प्रभाग तयार करण्यात आले असून, त्यातील शेवटचा एक प्रभाग ३ सदस्यांचा आहे. २०१५ मध्ये असलेले आरक्षणच पुढे चालू राहणार आहे. ११५ पैकी ५५ जागा आरक्षित राहतील. उतरत्या क्रमानुसार आरक्षण टाकण्याचे काम पुढील काही दिवसांत होईल, हे विशेष.
एप्रिल २०२० पासून महापालिकेची निवडणूक झाली नाही. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा निर्णय दिला. त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. शासनाने निवडणुका घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला प्रभाग आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शहरात प्रथमच प्रभागानुसार आराखडा तयार करण्यात आला. मनपाच्या निवडणूक विभागाने ६ ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाकडे आराखडा सादर केला. शासनस्तरावर आराखड्याची तपासणी सुरू आहे.
११५ नगरसेवक निवडून येणार२०१५ मध्ये ११३ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाई भाग मनपात समाविष्ट केला. त्यामुळे तेथून दोन सदस्य निवडून आले होते. मनपाची सदस्य संख्या ११५ झाली होती. आता प्रभागानुसार निवडणूक होईल. एका प्रभागात ४ सदस्य राहतील. २८ प्रभाग ४ सदस्यांचे, तर २९ वा प्रभाग ३ सदस्यांचा असेल. प्रभाग क्रमांक १ मध्ये १-ए, १-बी, १-सी, १-डी अशी सदस्यसंख्या राहील. २०११ मधील लोकसंख्या गृहीत धरून आराखडा तयार केला आहे.
१२ लाख २८ हजार लोकसंख्या२०११ च्या जनगणनेनुसार २०१२ मध्ये शहराची लोकसंख्या १२ लाख २८ हजार ३२ होती. निवडणुकीसाठी प्रगणक गट २ हजार २८६ होते. याचाच आधार मनपा निवडणुकीसाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे आरक्षणात किंचितही बदल होणार नाही. जुन्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल.
असे राहील आरक्षणओबीसीसाठी ३१ जागा आरक्षित राहतील. त्यामध्ये १६ महिलांचा समावेश राहील. एस. टी. प्रवर्गासाठी २ त्यात एक महिला, एससी प्रवर्गासाठी २२ जागा राहतील, त्यात ११ महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. सर्वसाधारण महिलांसाठी ३० जागा आरक्षित राहणार आहेत. आरक्षणाचा टक्का ५० टक्क्यांहून अधिक होता कामा नये, ही काळजी घेतली आहे. मनपात एकूण ५५ जागा आरक्षित राहतील.