इंग्लंडहून आलेले २९ जण कोरोना निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:53+5:302020-12-30T04:06:53+5:30
औरंगाबाद : इंग्लंडहून शहरात दाखल झालेल्या ४७ नागरिकांपैकी ३३ नागरिक शहरात वास्तव्याला आहेत. यापैकी दोघे जण पॉझिटिव्ह आढळून आले, ...

इंग्लंडहून आलेले २९ जण कोरोना निगेटिव्ह
औरंगाबाद : इंग्लंडहून शहरात दाखल झालेल्या ४७ नागरिकांपैकी ३३ नागरिक शहरात वास्तव्याला आहेत. यापैकी दोघे जण पॉझिटिव्ह आढळून आले, तर २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी आणखी दोघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या सर्वांना घरी राहण्याची परवानगी देण्यात आली असली तरी २८ दिवस त्यांच्या बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.
राज्य सरकारने २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान इंग्लंडहून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनाने इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांची कोरोना चाचणी केली. महिनाभरात शहरात इंग्लंडहून ४७ नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी एक महिला व एक तरुण असे दोघे जण पॉझिटिव्ह आढळून आले. सहा जण इंग्लंडला परत गेले असून, सात जण बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. एक जण इतर शहरात गेला आहे. २९ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोघांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल बुधवारी प्राप्त होणार आहे. ब्रिटनमध्ये नव्याने आढळून आलेल्या विषाणूने बाधित असल्याच्या शक्यतेने महापालिकेने दोन रुग्णांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.