विभागात २.८८ टक्के खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:04 IST2021-06-18T04:04:56+5:302021-06-18T04:04:56+5:30
--- औरंगाबाद : लहरी पावसामुळे अद्याप अनेक ठिकाणी पेरण्या थांबल्या आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन ८ दिवस सरले. अद्याप ...

विभागात २.८८ टक्के खरिपाची पेरणी
---
औरंगाबाद : लहरी पावसामुळे अद्याप अनेक ठिकाणी पेरण्या थांबल्या आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन ८ दिवस सरले. अद्याप विभागातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात केवळ २.८८ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात जालना जिल्हा पेरणीत आघाडीवर असून, ६.११ टक्के, बीड ३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ०.१८ टक्के पेरणी झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली. जिल्ह्यात पेरणीची प्रत्यक्ष स्थिती आणि कृषी विभागाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत आहे.
जिल्ह्यासह मराठवाड्यात रोहिणी नक्षत्रात जोरदार पावसाची हजेरी लागली. मात्र, मृग नक्षत्रात अनेक ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याने धूळ पेरणीतील उगवण झाली मात्र, कडकडत्या उन्हात उगवलेली पिके तग धरत नसल्याची सध्या परिस्थिती आहे, तर पेरणी योग्य ७० ते ८० मिलीमीटर पाऊस न झाल्याने अद्याप ९५ टक्क्यांहून अधिक पेरण्या खोळंबल्या आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात तालुका पातळीवरून पेरणीची आकडेवारी मिळण्यास उशीर होत असल्याने प्रत्यक्ष पेरणी आणि आकडेवारी यात फरक जाणवत आहे.
जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत सरासरी १९ लाख ९९ हजार ५३६ हेक्टर खरीपचे पेरणी क्षेत्र आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३२४ हेक्टर (०.१८ टक्के), जालना जिल्ह्यात ३४ हजार ८९३ हेक्टर (६.११ टक्के), तर बीड जिल्ह्यात २१ हजार २७३ हेक्टर (३.०० टक्के) अशी एकूण पेरणी क्षेत्रापैकी ५७ हजार ४९० हेक्टरवर २.८८ टक्के पेरणीपूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये खरिपाचे मका, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, भुईमूग, कापूस, बाजरी आदी पिकांसह कडधान्य पिकांचा समावेश आहे. जिल्हात कपाशीचे क्षेत्र कमी होताना दिसत असून, सोयाबीन, मक्याला अधिक पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.