२८ तोळे सोने हस्तगत
By Admin | Updated: August 10, 2014 00:09 IST2014-08-10T00:06:22+5:302014-08-10T00:09:29+5:30
परभणी : शहरातील पाथरी रोड भागातील घरफोडी प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीतील २८ तोळे सोने हस्तगत केले आहे.

२८ तोळे सोने हस्तगत
परभणी : शहरातील पाथरी रोड भागातील घरफोडी प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीतील २८ तोळे सोने हस्तगत केले आहे.
पाथरी रोडवरील संत तुकारामनगरात ३१ जुलै २०१४ रोजी घरफोडी झाली होती. या प्रकरणी प्रतिभा जनार्दन पाटील यांनी नानलपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविली. ३१ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून त्या नोकरीच्या ठिकाणी गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घर फोडून आतील ४० हजार रुपये नगदी आणि ३३ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे प्रतिभा पाटील यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरुन नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला. या तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सुरुवातीला एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी मिळून चोरी केल्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे चोरीतील लपवून ठेवलेले १९ तोळे सोने पोलिसांना दिले. त्याच्या साथीदाराकडून ९ तोळ्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणातील २८ तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले असून, या सोन्याची किंमत ७ लाख ८४ हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणात पोलिसांनी नितीन बाबूराव केळकर, विशाल कुऱ्हे व महंमद फसलोद्दीन या तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक राम घाडगे यांनी तपास केला. या कामी पोहेकॉ. हनुमंत (बाळू) जक्केवाड, अर्जून रणखांब, मुलगीर, बाळासाहेब तुपसुंदरे, मुजमुले, संजय पुरी, शरीफ पठाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. (प्रतिनिधी)
वारेमाप खर्च करणे आरोपीस पडले महागात
चोरीच्या प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस तपास सुरू होता. या दरम्यान हडको भागात एक जण वारेमाप खर्च करीत आहे. ५०० रुपयांच्या नोटा खर्च करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. संशयावरुनच पोलिसांनी नितीन बाबूराव केळकर यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर साथीदारांसह आपणच ही चोरी केल्याचे त्याने कबूल केले. या चोरीतील काही सोने विशाल कुऱ्हे व महंमद फैसलोद्दीन यांच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी एक आरोपी असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.