२८ जणांना घातला सव्वा कोटीचा गंडा
By Admin | Updated: January 2, 2017 23:53 IST2017-01-02T23:52:46+5:302017-01-02T23:53:24+5:30
गुंजोटी : दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखवित २८ जणांची तब्बल जवळपास सव्वा कोटींची फसवणूक

२८ जणांना घातला सव्वा कोटीचा गंडा
गुंजोटी : दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखवित २८ जणांची तब्बल जवळपास सव्वा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुंजोटी येथील शिक्षकासह त्याच्या दोन मुलाविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शिक्षक महेबुब अब्दुलरजाक शहानेदिवान हे मागील अनेक वर्षापासून बीसीचा व्यवसाय करत होते़ याचदरम्यान २०१३ मध्ये त्यांनी नॅशनल मल्टीपल्पज सोसायटी अंतर्गत नॅशनल बचत गट, जनता बचत गट, नॅशनल मल्टीपर्पज सेल्फ सपोर्ट ग्रुप अशा अनेक संस्थांची स्थापना केली़ यातून २४ टक्के दराने तीन वर्षात दामदुप्पट करून देण्याचे अमिष दाखवित लोकांच्या ठेवी स्वीकारल्या़ यात गुंजोटीसह परिसरातील अनेक ग्राहकांचा समावेश आहे़ उमरगा येथील सचिन प्रकाश बिद्री यांच्याकडून १० लाख २० हजार रूपये तर आस्लम उस्मान इनामदार यांच्याकडून ५ लाख रूपये व अन्य २६ ग्राहकांकडून ९४ लाखाच्या ठेवी स्वीकारल्या़ वरील नागरिकांनी वेळोवेळी पैशांची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती, असे सचिन बिद्री यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून महेबुब अब्दुलरजाक शहानेदिवान याच्यासह त्याचा मुलगा परवेज महेबुब शहानेदिवान व रिजवान महेबुब शहानेदिवान (सर्व रा़ गुंजोटी ता़उमरगा) यांच्याविरूध्द भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६८ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि दिनेश जाधव हे करीत आहेत़ (वार्ताहर)