२७ गावे अर्धवट स्थितीत
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:03:09+5:302014-06-15T00:35:37+5:30
सुनील चौरे, हदगाव ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेद्वारा ग्रामपंचायतीला निधी दिला जातो़ निधी मंजूर होतो डिसेंबर-जानेवारी महिन्यात व एक-दोन

२७ गावे अर्धवट स्थितीत
सुनील चौरे, हदगाव
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेद्वारा ग्रामपंचायतीला निधी दिला जातो़ निधी मंजूर होतो डिसेंबर-जानेवारी महिन्यात व एक-दोन महिन्यात त्याची विल्हेवाट न लावल्यास हा निधी लॅप्स होतो़ यामुळे अनेक गावांतील या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे २०१० पासून अर्धवट स्थितीत आहेत़
जि़ प़ म्हणजे मिनी मंत्रालय मानल्या जाते़ मंत्रालयाप्रमाणे यांचा कारभार असतो रामभरोसे़ जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी निधी देणारी योजना, परंतु ज्या कामासाठी निधी दिला जातो ते काम पूर्ण झाले का, त्या कामाचा दर्जा चांगला आहे का, किंवा एखाद्या ग्रामपंचायतने स्वत:चा निधी वापरून काम केल्याने त्या कामाचा त्या ग्रामपंचायतला निधी मिळाला का? याचे सोयरसूतक सध्यातरी या विभागाला नाही़
२०१०-११ मध्ये अंगणवाडी व स्मशानभूमीची ४२ कामे मंजूर झाली़ त्यापैकी २ कामे अद्याप सुरूच झाली नाहीत़ तर १३ कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत़ २०११-१२ या वर्षात अंगणवाडीचे १५ कामे मंजूर झाली़ पैकी सुरू न झालेली २ कामे व ९ कामे अर्धवट स्थितीत आहेत़
२०१२-१३ या वर्षात अंगणवाडीची ४ व स्मशानभूमी शेडची ११ कामांना मंजुरी मिळाली़ यापैकी एका अंगणवाडीचे काम अर्धवट आहे़ एकूण ७५ कामे मंजूर झाली़ त्यापैकी ४ कामे सुरूच झाली नाहीत़ २३ कामे अर्धवट स्थितीत आहेत़ या कामासाठी २०१०-११ मध्ये ८० लाख ५० हजार रुपये निधी मंजूर झाला़ २०११-१२ या वर्षात ६७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला़ २०१२-१३ या वर्षात ६३ लाख रुपये निधी मंजूर केला व २०१३-१४ या वर्षात १३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला़
ज्या ग्रामपंचायतने काम पूर्ण केले त्याचा निधी ४ वर्षांपासून थकित आहे़ त्यामुळे कामाचा दर्जा घसरतो़ मटरेल हलके वापरले जाते़ प्रत्येक वस्तूची किंमत दरवर्षी वाढते़ त्यामुळे मंजूर झालेल्या निधीत काम करण्यासाठी ग्रामसेवक काटकसर करतो़ या कच्च्या कामामुळे इमारतीचे काम पूर्ण होण्याआधीच ढासळते़
अर्धवट कामे असलेल्या अंगणवाड्या याप्रमाणे - धानोरा क्ऱ१ व २, मनाठा क्र,२, ३,४, वरवट-हरडफ क्ऱ२, भुरीतांडा (ऐवजी) तामसा, कोळी क्ऱ३, चाभरा क्ऱ२, निवळा, करमोडी, नेवरी, कनकेवाडी, हरडफ क्ऱ१, चाभरा क्ऱ३, कोळगाव, चाभरा क्ऱ२, चोरंबा (ना़) क्ऱ१, सावरगाव क्ऱ१, निमगाव क्ऱ४, पेवा क्ऱ२, वडगाव बु़ क्ऱ१, भाटेगाव क्ऱ१, खरबी क्ऱ२़
कामे सुरू न झालेल्या अंगणवाड्या - कंजारा (खु़), पिंगळी क्ऱ२, निमटोक, चक्री, तालंग ९, शेंदण़
स्मशानभूमी अर्धवट स्थितीतील - तळणी, हरडफ, येवळी, चाभरा आदी ठिकाणी कामे निधीअभावी अर्धवट आहेत़ तर हडसणी, शिरड, मनाठा, कोथळा, शिरड, डोरली, भानेगाव, पिंपळगाव, सावरगाव आदी कामे प्रगतीवर आहेत़ पूर्ण नाहीत़ एकीकडे जिल्ह्यात, तालुक्यात एवढ्या अंगणवाडीचे काम पूर्ण झाले म्हणून दिंडोऱ्या पिटायच्या व दुसरीकडे अंगणवाडी ढासळली की, पुन्हा निधीची मागणी करायची हा क्रम केव्हा थांबणार? असा सवाल आहे. संबंधितांचे डोळे उघडणार केव्हा? असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे.
प्रत्येक वर्षात निधी अडकला
२०१३-१४ या वर्षीची जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची बैठक फेब्रुवारीमध्ये झाली़ १३ लाख ५० हजार रुपये मंजूर केले व कोणत्याही ग्रामपंचायतने काम सुरू करण्याआधीच मार्चएण्ड लागला व निधी लॅप्स झाला़ २०१० ते २०१३ या प्रत्येक वर्षात अशाच नियमात निधी अडकला़ ग्रामीण भागात अंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध नसते़ जागा उपलब्ध करण्यासाठी पाच-सहा महिन्यांचा कालावधी जातो़ काम सुरू केले की, मार्च महिना येतो़ पाणीटंचाई, लेबर आदीमुळे कामाला विलंब होतो़ त्यामध्ये निधी गोल होतो़ निधी मंजूर करण्यासाठी एप्रिल-मे महिना ठरवला तर १० ते ११ महिने शिल्लक राहतात़ त्यामध्ये काम पूर्ण होवू शकत नाही.
ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यातच आहे़ केवळ हदगाव तालुक्याची नाही - दयानंद शिंदे (अभियंता, हदगाव)
निधीअभावी आम्ही काम करू शकत नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो़ आमच्या तक्रारी वरिष्ठापर्यंत जातात़ निधीचा अपहार केल्याचा आरोप आमच्यावर होतो - पांडुरंग श्रीरामवार, अध्यक्ष, ग्रामसेवक संघटना, हदगाव़