वीस दिवसांत २६० कारवाया
By Admin | Updated: July 23, 2014 00:29 IST2014-07-22T23:04:27+5:302014-07-23T00:29:47+5:30
बीड : पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मटका, जुगार, अवैध वाहतूक व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

वीस दिवसांत २६० कारवाया
बीड : पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मटका, जुगार, अवैध वाहतूक व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांचे ठिकठिकाणी धाडसत्र सुरू असल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी नारायण शिरगावकर व सुधीर खिरडकर यांच्या पथकाद्वारेही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मटका चालविणारे व गुटख्याची साठेबाजी करणारे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. त्यांनाही ताब्यात घेऊन गुन्हे दाखल होत आहेत. पहिल्यांदाच हा फंडा राबविण्यात येत असल्याने याचा धसका अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला आहे.
बीड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरु असून त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची पाच पथके तयार करुन त्यांच्या मार्फत एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्याचा फॉर्म्युला अवलंबिला आहे. जिल्ह्यातीलच मात्र इतर तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही ठिकाणी धाड टाकतांना अडचणी येत नसल्याने जोरदार कारवाई सुरु आहे.
पोलीस अधीक्षक रेड्डी रुजू झाल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याचा आढावा घेतला. कोणत्या ठिकाणी काय सुरू आहे, याची माहिती करुन घेऊन कारवाईचा फास आवळला आहे. अधिक गाजावाजा न करता कारवाई होत असल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. मटकाबुकी तर ताब्यातच घेतले, शिवाय याला प्रोत्साहन देणाऱ्यांनाही ताब्यात घेतले. प्रथम, जिल्ह्यात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाडी टाकण्यात आल्या, त्या सोबतच ज्या ठिकाणी विनापरवाना दारु विक्री करण्यात येत आहे, त्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. ग्रामीण भागात टपरी, चौक व गाड्यांवर अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाल्यानंतर त्या-त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यात आली. मटका बुकींवर कारवाई केली म्हणजे ते पूर्णत: बंद होतील, अशी अपेक्षा करणे फोल ठरले मात्र पोलीस वेळोवेळी धाडी टाकत असल्याने अनेकांनी आपली दुकाने बंद केली आहेत.
कारवाईचे सत्र सुरुच असल्याने अवैध धंदे सुरु करणे जवळपास थांबले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात अवैधरित्या दारु विक्रीचा धंदा जोरात सुरु असतो. ही दारु बहुतांश वेळा बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अवैध दारु स्वस्त विक्री करण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी गेवराई तालुक्यात बनावट दारु तयार करण्याचे केमीकल टँकर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. त्यामुळे जिल्ह्यात बनावट दारु तयार होत असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे अवैधरीत्या विक्री केली जाणारी दारु ही बनावट असू शकणार नाही, याची शाश्वती देता येत नाही.
जिल्ह्यातील धाबे, टपऱ्या, हॉटेल्स अनेक भागांमध्ये बनावट दारु विक्री होत असल्याचे तक्रारी आहेत. ही अतिशय गंभीर समस्या असल्याने याकडे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. पोलिसांकडे तक्रारी किंवा गुप्त माहिती मिळाल्यास कारवाई होते मात्र जिल्ह्यात दारुचा पुरवठा योग्य पध्दतीने होतो काय ? याची चाचपणी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
शहरात साडेआठ लाखांचा गुटखा जप्त
बीड : शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शुक्रवार पेठ भागातून प्रशिक्षणार्थी डीवायएसपी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने आठ लाख ६६ हजार ६४८ रुपयांचा गुटखा सोमवारी रात्री पकडला.
पोलीसांनी फिरोज दस्तगीर शेख याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा साथीदार बाबू शेख फरार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी गेवराईत सात लाखांचा गुटखा पकडला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी नारायण शिरगावकर, पोकॉ विकास राठोड, विशाल वडमारे यांनी केली. अन्ना सुरक्षा अधिकारी सागर तेरकर व डी.जी. वीर यांचे कारवाईसाठी सहकार्य लाभले.
उमरी, नागापूर येथे कारवाई
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्या पथकाने बीड तालुक्यातील उमरीत जुगार अड्ड्यावर तर नागापूर येथे अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली़
परळीत रेल्वेतून गुटख्याची आयात ?
परळी पासून हैदराबाद, सिकंदराबाद जवळ असल्याने आंध्र प्रदेशातून परळी तालुक्यात येत असल्याने खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.
चौका-चौकातील टपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याने तरुण पिढी याच्या आहारी जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करत नसल्याने गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
परळीत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गुटख्याची विक्री रोखावी, अशी मागणी शिवसेनेचे शहर उप-प्रमुख सचिन स्वामी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी केली आहे.
मटका बुकी पकडला
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी शिरगावकर यांनी दुचाकीवर चाललेल्या मटकाबुकीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून बावन्न हजार सातशे पन्नास रुपये व इतर साहित्य जप्त केले आहे. दामू जयराम मुने याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालासाहेब जाधव याचा तपास पोलीस करीत आहेत.
कबाड गल्लीतही पकडला गुटखा
प्रशिक्षणार्थी डीवायएसपी शिरगावकर यांच्या पथकाने कबाड गल्ली भागातील शंकर लक्ष्मण कुराळे याच्याकडून दहा हजार रुपयांचा गुटखा सोेमवारी रात्री पकडला. त्याच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांवर कारवाई सुरूच राहणार - रेड्डी
जिल्ह्यात पोलिसांनी १ जुलैपासून अवैध धंद्यावर धाड टाकण्यास सुरुवात केली. २० जुलै पर्यंत अवैध दारूविक्रीचे १७६ गुन्हे दाखल झाली असून १८५ आरोपींना अटक झाली. त्यांच्याकडून ४ लाख तीस हजार रुपयांची दारु जप्त करण्यात आली. जुगाराची ८० प्रकरणे दाखल झाली असुन १८६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर गुटख्याच्या चार केसेस दाखल केल्या असून जवळपास गुटख्यासह २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले़
साठेबाजांची माहिती घेण्यास सुरुवात
जिल्ह्यात विविध भागांतून गुटखा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली आहे़ गुटख्याची साठेबाजी करुन बाजारात विक्री केली जात असल्याचे समोर आल्याने पोलिसंनी साठेबाजी करणाऱ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसात साठेबाजांवर कारवाईची शक्यता आहे़