२५ % फटाके शिल्लक
By Admin | Updated: October 31, 2016 00:45 IST2016-10-31T00:39:49+5:302016-10-31T00:45:50+5:30
सुमारे २० ते २५ टक्के फटाके विक्रीविना शिल्लक राहिल्याचे दिसून आले.

२५ % फटाके शिल्लक
औरंगाबाद : जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट शनिवारच्या आगीमध्ये भस्मसात झाले. परिणामी, अन्य ठिकाणच्या फटाका बाजारांत यंदाचेच नव्हे, तर मागील वर्षीचेही फटाके विकले जातील, असा होरा व्यक्त केला जात होता. मात्र, झाले उलटेच. रात्री लक्ष्मीपूजनानंतर फटाका बाजारांत बहुतांश दुकाने फटाक्यांनी सजलेलीच होती. सुमारे २० ते २५ टक्के फटाके विक्रीविना शिल्लक राहिल्याचे दिसून आले.
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर अग्नितांडव घडले. यात सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे केवळ व्यापारी वर्गच नव्हे, तर संपूर्ण शहरवासीयांना मोठा हादरा बसला.
या आगीमध्ये १० कोटींचे फटाके नष्ट झाले. एकसुद्धा फटाका नावालाही शिल्लक राहिला नाही. शहरातील नागरिक फटाके खरेदीसाठी हडकोतील टीव्ही सेंटर मैदान किंवा सिडको एन-५ येथील राजीव गांधी क्रीडांगण येथे जातील, अशी अपेक्षा होती.
मात्र, या दोन्ही फटाका मार्केटमधील परिस्थिती वेगळीच होती. येथे दरवर्षीप्रमाणे फटाके खरेदीसाठी गर्दी झाली होती; पण विक्रीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली नाही. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत या फटाका मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती. त्यानंतर मात्र गर्दी ओसरली. आमच्या प्रतिनिधीने रात्री ९ वाजेदरम्यान या फटाका मार्केटमध्ये फेरफटका मारला तेव्हा बहुतांश दुकाने फटाक्यांनी सजलेलीच दिसून आली. फटाके विकले गेले; पण ७५ टक्केच. कारण, शहरातील ग्राहक अपेक्षेनुसार फटाके खरेदीसाठी सिडको-हडकोत फिरकलेच नाहीत. हडकोतील भारतमाता फटाका असोसिएशनचे अध्यक्ष मनोज गायके यांनी सांगितले की, सर्व विक्रेत्यांचा मिळून २० ते २५ टक्के माल शिल्लक राहिला आहे. जुन्या शहरातील ग्राहक कमी प्रमाणात हडकोत फटाके खरेदीसाठी आले. हे ग्राहक आले नसते, तर ३० ते ३५ टक्के माल शिल्लक राहिला असता. आता शिल्लक फटाके कुठे ठेवायचे, असा यक्ष प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. कारण, फटाक्यांची विक्री लक्ष्मीपूजनाला जास्त होत असते. आता शिल्लक माल येत्या लग्नसराईत विक्री करावा लागेल.