हिंगोली : जिल्ह्यातील एकूण १२ मोठ्या पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकापोटी २४ कोटी ६७ लाख १२ हजारांची थकबाकी आहे. एकेकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. जोडपिंपरीतील वीजपुरवठा बंद केल्याची माहिती महावितरणकडून मिळाली आहे. हिंगोली जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागाच्या १२ मोठ्या पाणीपुरवठा योजना आहेत. नगरपालिका, ग्रा. पं. अथवा प्रादेशिक योजनांचा यात समावेश आहे. मुख्याधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे या जोडण्या घेतल्या आहेत. विविध ठिकाणी या जोडण्या दिल्या आहेत. यात डिग्रस, कळमनुरी, कडपदेव, धानोरा, जोड पिंपरी, वगरवाडीसह सिद्धेश्वर या चार ठिकाणी विद्युत पुरवठा सुरु आहे. मात्र अनेक योजनांची वीजबिल थकबाकी राहत आहे. काहींचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्रामुख्याने जोडपिंपरी येथील योजनेचे २३ लाख ८५ हजार रुपयाचे वीज बिल थकित असून, चालू बील १३ हजार रुपये आहे. तेही न भरल्याने वीजपुरवठा बंद केला आहे. वास्तविक पाहता १२ ठिकाणी सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कोटी व लाखांच्या वरच थकबाकी आहे. कंपनीतेर्फ पेयजल संजीवनी योजनेंतर्गत व्याज व दंड १०० टक्के माफ यानुसार थकित वीजबिल वसुली करण्यात येत आहे. यात ५० टक्के संबंधित मूळ थकबाकी आणि ५० टक्के १४ वित्त आयोगातून शासन भरत असते. याप्रमाणे वीज भरण्यासाठी नोटिसीद्वारे कळविल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच हळूहळू वसुली सुरु असून, कळमनुरी व हिंगोली येथील काही प्रमाणात वसुली झाली आहे. तर वसमत येथील अद्याप चेक येणे बाकी आहे. (वार्ताहर)
पाणी योजनांचे २५ कोटी थकले
By admin | Updated: January 16, 2016 23:18 IST