पाच वर्षात २४७ जणांनी थाटला ‘नोंदणीकृत’ संसार
By Admin | Updated: July 1, 2014 01:05 IST2014-07-01T00:27:34+5:302014-07-01T01:05:11+5:30
उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा!

पाच वर्षात २४७ जणांनी थाटला ‘नोंदणीकृत’ संसार
उस्मानाबाद : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद बाब! जीवनातील हा सुखद क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा! परंतु, वाढती महागाई, हॉलचे भाडे आदीमुळे स्वप्नातील विवाहसोहळे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत़ अनाठायी खर्चाला फाटा देत युवा पिढी नोंदणीकृत विवाहाला पसंती देत आहे़ जिल्ह्यात पाच वर्षात २४१ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह करून आपले संसार थाटले आहेत.
ना जातीची अडचण ना पैशाची उधळपट्टी. उलट कायदेशीर मान्यता हे नोंदणी विवाहाचे वैशिष्ट्य आहे. नोंदणी विवाह करण्याचा सर्वात मोठा आणि प्राथमिक फायदा म्हणजे नोंदणीमुळे पती-पत्नीच्या नात्यावर कायद्याची मोहोर बसते. कोणत्याही नवदाम्पत्यासाठी ही कायदेशीर बाब पूर्ण होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी दोन भिन्न जाती किंवा धर्मातील तरूण-तरूणी त्यांच्या घरातून विरोध झाल्यास नोंदणी विवाहाचा पर्याय निवडत. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे पारंपरिक पध्दतीने विवाह निश्चित करून नोंदणी पध्दतीने विवाह लावले जात आहेत. याशिवाय ज्यांना परदेशी जायचे आहे किंवा तेथे स्थायिक व्हायचे असेल तर पासपोर्टसाठी नोंदणी विवाहाचे प्रमाणपत्र प्रमुख ‘डॉक्युमेंट’ मानले जाते. म्हणून अनेक परिवारात विवाह नोंदणी पध्दतीने करून नंतर पारंपरिक पध्दतीने स्वागत समारंभ पार पडतानाही दिसतात.
उस्मानाबाद येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील २००९ पासून झालेल्या विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता २०१३ साल वगळता दरवर्षी ४० ते पन्नास विवाह नोंदणीकृत झाल्याचे दिसते. या कार्यालयात २००९ साली ४२ जोडप्यांनी नोंदणीकृत विवाह केले. २०१० व २०११ साली प्रत्येकी ४७ तर २०१२ मध्ये हा आकडा ४९ वर गेला होता. २०१३ मध्ये मात्र यात थोडीशी घट होऊन तो ३५ वर आला. तर चालू सन २०१४ मध्ये आतापर्यंत २१ जणांनी नोंदणीकृत विवाह केले आहेत.
या विवाहासाठी खर्च अत्यल्प प्रमाणात येतो. ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयाकडे अर्ज करायचा असतो. मुलगा किंवा मुलगी ही उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर नोटीस जारी केले जाते. यावर काही आक्षेप आले नाही तर नोटीस जारी केल्यापासून ३१ व्या दिवसापासून ९० दिवसांपर्यंत कधीही नोंदणी विवाहाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
नोंदणी केल्यानंतर विवाह न करणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे येथील विशेष नोंदणी कार्यालय अधिकारी बी. बी. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)