२४ गावे जोखीमग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:33 IST2016-07-03T23:56:51+5:302016-07-04T00:33:51+5:30
संजय तिपाले , बीड मागील पाच वर्षांत साथरोगांचा उद्रेक झालेली २४ गावे यंदा आरोग्य विभागाने अतिजोखमीची म्हणून जाहीर केली आहेत. या गावांत जलजन्य आजारांची पुनरावृत्ती होऊ नये

२४ गावे जोखीमग्रस्त
संजय तिपाले , बीड
मागील पाच वर्षांत साथरोगांचा उद्रेक झालेली २४ गावे यंदा आरोग्य विभागाने अतिजोखमीची म्हणून जाहीर केली आहेत. या गावांत जलजन्य आजारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाबरोबरच योग्य त्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.
१७ जून रोजी नेकनूर (ता. बीड) येथे गॅस्ट्रोने पूजा महादेव जाधव या तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे साथरोगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०१२ पासून आतापर्यंत साथरोगामुळे तीन मृत्यू झाल्याची नोंद जि.प. च्या आरोग्य विभागाच्या दफ्तरी आहे; परंतु प्रत्यक्षात हा आकडा त्याहून अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पावसाळ्यात साथरोग आपले हातपाय पसरवत असतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत साथरोगाचे रुग्ण आढळलेली गावे जोखीमग्रस्त जाहीर करुन तेथे उपाय केले जातात. जिल्ह्यात अशी २४ गावे आहेत. गेवराई तालुक्यातील सर्वाधिक ९ गावांचा यात समावेश आहे. नदीकाठची १४९ व यात्रा भरणारी ३९ गावे देखील साथरोगांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आरोग्य विभागामार्फत सुरु आहेत. त्यासाठी या सर्व गावांमधील जलस्त्रोतांमध्ये लिक्वीड क्लोरिन टाकले असून १५ मिटर परिसरात साफसफाई करुन घाण पाणी साचणार नाही अशी व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)
माजलगाव : सुर्डी, भीमनगर, आष्टी : देवीनिमगाव, शेकापूर, पाटोदा : खोकरमोहा, निवडुंगा, केज : होळ, माळेवाडी, मस्साजोग, धारुर : तांदळवाडी, अंजनडोह, गेवराई : अर्धमसला, पाचेगाव तांडा, गौडगाव तांडा, चोपड्याचीवाडी, गोपतपिंपळगाव, मन्यारवाडी, गुळज, भोगलगाव, मादळमोही, बीड : घोसापुरी, येळंबघाट, अंबाजोगाई: अंजनपूर, माळेवाडी ही गावे जोखमीची जाहीर केली आहेत.