जिल्ह्यातील सीमा नाक्यांवर २४ तास पोलिसांची नजर
By Admin | Updated: November 19, 2014 00:59 IST2014-11-19T00:53:19+5:302014-11-19T00:59:13+5:30
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी, घरफोड्या व अन्य गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे़ ही गुन्हेगारी रोखण्यासाठी व गुन्हे उघड करण्यासाठी जिल्ह्याच्या

जिल्ह्यातील सीमा नाक्यांवर २४ तास पोलिसांची नजर
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी, घरफोड्या व अन्य गुन्हेगारींचे प्रमाण वाढत आहे़ ही गुन्हेगारी रोखण्यासाठी व गुन्हे उघड करण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमांवर २४ तास नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या नव्या योजनेला मंगळवारी प्रारंभ केला आहे़
जिल्ह्यातील गुन्हेगारी, गुन्हेगारांनी अवलंबलेली पध्दत, त्याचे कार्यक्षेत्र, गुन्हेगारांच्या येण्याजाण्याचे मार्ग या बाबींचा अभ्यास करून २४ तास नाकाबंदी लावण्यात आली आहे़ जिल्ह्यातील मुरूड पोलिस स्टेशन हद्दीत वाटवडा, तांदुळजा़ रेणापूर पोलिस ठाणे हद्दीत रेणापूर-पळशी फाटा, चाकूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चाकूर-आष्टामोड, अहमदपूर पोलिस ठाणे हद्दीत सांगवी फाटा, देवणी पोलिस ठाणे हद्दीत तोगरी फाटा, किल्लारीत उमरगा रोड, किल्लारी पूल, औराद पोलिस ठाणे हद्दीत औराद बॉर्डर, भादा ठाण्याच्या हद्दीत शिवली बॉर्डर आदी ठिकाणी २४ तास नाकाबंदी पॉइंट नेमण्यात आले आहेत़ त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी ४० पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे़ त्यांच्याकडे राहुटी, बिनतारी संच पुरविण्यात आले आहेत़ तसेच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नवीन रेणापूर नाका, नवीन नांदेड नाका, पीव्हीआर चौक, औसा रिंगरोड या ठिकाणी नाकाबंदी पॉइंट स्थापन करण्यात आले आहेत़ २० पोलिस जवान या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत़ या कर्मचाऱ्यांमार्फत नाकाबंदी दरम्यान संशयित वाहने, गुन्हेगार चेक करून वाहन कोठून आले, कुठे जाणार याची तपासणी केली जाईल़ जाणाऱ्या वाहनांत प्रवाशांची संख्या, त्यांचे नाव, गाव, पत्ता याची नोंद नाक्यावर केली जाणार आहे़
नाकाबंदी पॉइंटवर येणाऱ्या जाणाऱ्याच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे़ नाकाबंदी अंतर्गत असलेले प्रभारी अधिकारी पेट्रोलिंग व नियंत्रण असेल़ (प्रतिनिधी)