प्रत्येक अडचणीत धावून येणार ‘२४ तास हेल्पलाईन’
By Admin | Updated: October 2, 2014 01:22 IST2014-10-02T01:18:42+5:302014-10-02T01:22:11+5:30
औरंगाबाद : आता कुठल्याही अडचणीमुळे हताश होण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी ‘२४ तास हेल्पलाईन’ औरंगाबादेत पुढे येतेय.

प्रत्येक अडचणीत धावून येणार ‘२४ तास हेल्पलाईन’
औरंगाबाद : आता कुठल्याही अडचणीमुळे हताश होण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी ‘२४ तास हेल्पलाईन’ औरंगाबादेत पुढे येतेय. जी तुमच्या अगदी लहान-सहान पण त्रासदायक अशा अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला सहकार्य करणार आहे. आमदार राजेंद्र दर्डा यांनी बनविलेल्या औरंगाबादच्या जाहीरनाम्यात यासह अनेक महत्त्वाच्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत.
सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनलेला औरंगाबादचा जाहीरनामा तयार झाला आहे. तब्बल ५२ हजार घरांपर्यंत जाऊन, जनतेची मते विचारात घेऊन हा जाहीरनामा अर्थात ‘व्हिजन औरंगाबाद’ तयार करण्यात आले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मते जाणून घेऊन एखाद्या उमेदवाराने आपला जाहीरनामा तयार करणे हा निवडणुकीच्या इतिहासातील विक्रमच आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासाच्या दृष्टीने तयार केलेल्या या जाहीरनाम्याचे महत्त्व वाढले आहे. आमदार राजेंद्र दर्डा यांच्या संकल्पनेतून ‘टीम औरंगाबाद’ने औरंगाबादचा जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प केला आणि जोमाने कामाला सुरुवात केली. यासाठी प्रारंभी औरंगाबादच्या प्रमुख विषयांच्या जाणिवेतून प्रश्नावली तयार करण्यात आली. औरंगाबादकरांना भविष्यातील शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले. यामध्ये अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने जाहीरनामा तयार करण्याच्या कामाला गती मिळाली. औरंगाबादकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. औरंगाबादचा जाहीरनामा अर्थात ‘व्हिजन औरंगाबाद’ पाहून आपण औरंगाबादच्या विकासात जनतेची भूमिका जाणून घेऊ शकतो याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया राजेंद्र दर्डा यांनी दिली. ‘व्हिजन औरंगाबाद’ हे केवळ देखाव्याकरिता तयार करण्यात आालेला निवडणूक जाहीरनामा नसून औरंगाबादला एक अत्याधुनिक महानगर बनविण्यासाठी जनतेनेच तयार केलेले व्हिजन असल्याचे राजेंद्र दर्डा म्हणाले.
५२ हजार घरांचा महासर्व्हे करून बनविले ‘व्हिजन औरंगाबाद’
शहरात पासपोर्ट कार्यालय; सर्वत्र वायफाय; लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन
राजेंद्र दर्डा यांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या आशा-आकांक्षापूर्तीचे आश्वासन
पायाभूत सुविधांना प्राधान्य
‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येईल. नवीन औरंगाबादेत सिडको व म्हाडाच्या माध्यमातून घरांची उभारणी करण्यात येईल. प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात प्रत्येक वॉर्डात किमान एक सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे.
‘झंडा ऊंचा रहे हमारा...’
राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम करीत औरंगाबादचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्णाक्षरांत नोंदविण्यात आले. आता शहरात सर्वांत उंच राष्ट्रध्वज फडकविण्यात येईल. देशप्रेमाचा नवा आदर्श घालून देण्यासाठी एक अभियान म्हणून हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येईल.