२४ वाळूपट्ट्यांवर फेरतपासणीचा बडगा...
By Admin | Updated: December 1, 2015 00:29 IST2015-12-01T00:20:34+5:302015-12-01T00:29:39+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५ वर्षांसाठी देण्यात आलेल्या २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यासाठी गौण खनिज अधिकाऱ्यांसह तहसीलची पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

२४ वाळूपट्ट्यांवर फेरतपासणीचा बडगा...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ५ वर्षांसाठी देण्यात आलेल्या २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यासाठी गौण खनिज अधिकाऱ्यांसह तहसीलची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी जिल्ह्यातील खासगी जागांवरील २४ वाळूपट्टे ५ वर्षांसाठी देण्याचे करार करून दिले होते. त्या पट्ट्यांवर आता गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार महिन्यांतच ते पट्टे फेरतपासणीच्या फेऱ्यात आले आहेत. वाळूपट्ट्यांचा लिलाव पर्यावरण समितीच्या कचाट्यात अडकल्यामुळे तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांमधून पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह न झाल्याने वाळूसाठे निर्माण होण्यावर त्याचा परिणाम झाला.
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना वाळूपट्ट्यांना परवानगी देण्यास पर्यावरण विभागाने नकार दिल्यामुळे २४ वाळूपट्टे वादात अडकले आहेत. या वाळूपट्ट्यांच्या विरोधात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून जिल्हा प्रशासनाने २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाळूपट्ट्यांच्या मालकांकडून दरमहा पावती पुस्तकाचा हिशेब सादर केला जात नाही. त्यांच्याकडे पाठविण्यात आलेले रेकॉर्ड रजिस्टर तपासणीसाठी गौणखनिज विभागाकडे दिले नाही. त्यामुळे या वाळूपट्ट्यातून नेमकी किती वाळू उपसण्यात आली याची माहिती मिळत नसल्याने त्या फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फुलंब्रीमधील १, पैठणमधील १२, उर्वरित वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील वाळूपट्ट्यांचा समावेश आहे. वाळूपट्ट्यांतील उपशाची मोजदाद उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या तहसीलच्या पथकाद्वारे होईल. २४ वाळूपट्ट्यांची फेरतपासणी करण्यात येत असून गौणखनिज अधिकाऱ्यांसह तांत्रिक अधिकाऱ्यांचाही या पथकात समावेश करण्यात आला आहे.