दीड वर्षात विवाहितांच्या छळाचे २३३ गुन्हे

By Admin | Updated: July 11, 2014 00:59 IST2014-07-10T23:55:43+5:302014-07-11T00:59:20+5:30

विजय मुंडे, उस्मानाबाद अरे संसार संसाऱ़ या बहिणाबार्इंच्या काव्यपंक्तींचा अर्थ जणू आजच्या पिढीला उमगला नसल्याचे पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणांवरून दिसून येते़.

233 offenses of marital affair in one and half year | दीड वर्षात विवाहितांच्या छळाचे २३३ गुन्हे

दीड वर्षात विवाहितांच्या छळाचे २३३ गुन्हे

विजय मुंडे, उस्मानाबाद
अरे संसार संसाऱ़ या बहिणाबार्इंच्या काव्यपंक्तींचा अर्थ जणू आजच्या पिढीला उमगला नसल्याचे पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणांवरून दिसून येते़ गत दीड वर्षात विवाहितांच्या छळाचे २३३ गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असून, यातील १५६ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत़ कलम ४९८ (अ) चा गैरवापर होत असल्याचे समोर आल्याने गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक न करता चौकशीअंती तथ्य आढळल्यानंतर अटक करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ या निर्देशाबाबत ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेदरम्यान महिलांच्या छळामागे पैसा आणि समन्वयाचा अभाव हेच प्रमुख कारण ठरत असल्याचे समोर आले़ तर काही प्रकरणात महिलांचाही आततायीपणा नडल्याचे सांगण्यात आले़
हुंड्यात राहिलेले पैसे, जमीन, गाडी घेण्यासह इतर कारणांसाठी लागणारे पैसे, चारित्र्यावरील संशय, काम येत नसणे, चांगली दिसत नाही, स्वयंपाक येत नाही, अशा अनेक कारणांवरून विवाहितांचा जाचहट सुरू आहे़ दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीत दरवर्षी वाढच होताना दिसत आहे़ दाखल प्रकरणात केवळ पती-पत्नीस नव्हे तर सासर-माहेरकडील अनेक मंडळींनाही त्रास सहन करावा लागतो़ मात्र, काही प्रकरणात या कलमाचा दुरूपयोग होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे़ केवळ पती कारणीभूत असला तरी सासू-सासरे, दीर, भावजयीसह परगावी राहणाऱ्या नदंण, तिच्या पतीसही या प्रकरणात गोवण्याचा प्रकारही समोर आला आहे़ ही मंडळी न्यायालयात निर्दोष सुटली तरी समाजात होणारी बदनामी आणि जेलची खावी लागणारी हवा यामुळे त्यांच्या मानसिकतेतही बदल होताना दिसून येतो़ काही प्रकरणात माहेरकडील मंडळी हस्तक्षेप करीत असल्याचेही दिसून आले आहे़ त्यांच्या सांगण्यामुळे गुन्हे दाखल झाल्याचेही दिसून येते़ अनेकवेळा महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर प्रथमत: महिला तक्रार निवारण कक्षातील अधिकारी, कर्मचारीही हे प्रकरण ठाण्यात जावू नये यासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करतात़ अनेकांच्या संसाराची विस्कटलेली घडी बसविण्याचे काम करत आहे़ तेथेही तडजोड झाली नाही तर ठाण्यात तक्रारी दाखल होतात़ (प्रतिनिधी)
समेटासाठी प्रयत्न
महिला तक्रार निवारण कक्षाकडे दाम्पत्यामधील वादाचे प्रकरण आल्यानंतर आम्ही त्या दोघांमध्ये व कुटुंबात असलेला तणाव मिटविण्याचे काम करतो़ दोन्हीकडील मंडळींना बोलावून पुढील सामाजिक ताणतणाव व इतर बाबींवर समुपदेशन करून अधिकाधिक प्रकरणे कक्षातच मिटविण्यावर आम्ही भर देतो, असे महिला तक्रार निवारण कक्षातील सपोफौ माया दामोदरे यांनी सांगितले़
समुपदेशनावर भर
महिला तक्रार निवारण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारीत आम्ही सासर-माहेरच्या मंडळींना बोलावून समुपदेशन करतो़ दोन्हीकडील बाजू समजावून घेत त्यांना समज देण्यात येते़ शिवाय पोलिस प्रकरण, न्यायालयातील प्रकरणानंतर समाजात येणाऱ्या अडचणी सांगून अधिकाधिक तंटे कक्षातच मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात़ ज्यांचे प्रकरण मिटत नाही ते पोलिस ठाण्यात तक्रारी देतात, असे कक्षप्रमुख पोनि माधव गुंडीले म्हणाले़
पोलिसांना सूचना देण्याची गरज
काही प्रकरणात ४९८ (अ) चा गैरवापर होत असल्याचे दिसून येते़ मात्र, महिलांवर अन्याय, अत्याचार होतात ही बाब नाकारून चालणार नाही़ त्यामुळे तपासादरम्यान खरे आरोपी सुटू नयेत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे़ पोलिसांनी तपासात कुचराई केली तर पीडित महिलांना न्याय मिळण्याबाबत साशंकता आहे़ त्यामुळे न्यायालयाने पोलिसांनाही तपासादरम्यान खरे आरोपी सुटू नयेत, याबाबत सक्तीच्या सूचना देण्याची गरज अ‍ॅड़वैशाली धावणे-देशमुख यांनी व्यक्त केली़
निर्णय स्वागतार्ह
कलम ४९८ (अ) मध्ये अनेकवेळा ज्यांचा संबंध नसतो, अशांचीही नावे आलेली दिसून आले आहे़ लग्न झालेली नणंद व तिच्या पती व इतर नातेवाईकांची नावे येतात़ प्रकरणांची चौकशी आणि न्यायालयात चाललेल्या खटल्यात समोर आलेल्या पुराव्यात त्या लोकांचा संबंध नसल्याचे दिसून येते़ त्यामुळेच असे प्रकार रोखण्यासाठी न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आऱएस़लोमटे म्हणाले़
महिलांना न्याय मिळावा
सर्वोच्च न्यायालयाने समोर आलेल्या अनेक प्रकरणांवरून ४९८ (अ) बाबत निर्देश दिले आहेत़ आम्ही निर्भया हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो़ महिलांवर अगणित अत्याचार होतात़ काही प्रकरणात नसले तरी अनेक प्रकरणात तथ्य असते़ न्यायालयाचे निर्देश योग्य असले तरी महिलांना न्याय मिळणे गरजेचे असल्याचे निर्भयाच्या भूम हेल्पलाईन प्रमुख अ‍ॅड़अमृता गाढवे यांनी सांगितले़

Web Title: 233 offenses of marital affair in one and half year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.