सात वर्षात २३० आत्महत्या
By Admin | Updated: December 15, 2014 00:42 IST2014-12-15T00:38:12+5:302014-12-15T00:42:17+5:30
उस्मानाबाद : मागील सात वर्षात जिल्ह्यातील २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यापैकी केवळ ६७ शेतकऱ्यांना पात्र ठरवून मदत वाटप करण्यात आली आहे

सात वर्षात २३० आत्महत्या
उस्मानाबाद : मागील सात वर्षात जिल्ह्यातील २३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यापैकी केवळ ६७ शेतकऱ्यांना पात्र ठरवून मदत वाटप करण्यात आली आहे. दरम्यान मागील वर्षभरात ५९ शेतकऱ्यांनी आतम्हत्या केल्या असून, त्यातील १६ जणांनाच मदत देण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा मागील अनेक वर्षापासून दुष्काळी स्थितीचा सामना करीत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ जिल्हावासियांच्या नशिबी राहिला आहे. मागील काही वर्षत ही स्थिती आणखीणच केविलवाणी होत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी गारपीटीचे नवेच संकट शेतकऱ्यांवर कोसळले. त्यात लाखावर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली मात्र सदर मदत देतानाही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गारपीटीने रब्बी ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती अडचणीत आलेली असतानाच यंदा पुन्हा शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच वाढत जात असल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.