२३० कृषी सहायकांचे कामबंद आंदोलन सुरू
By Admin | Updated: July 13, 2017 00:33 IST2017-07-13T00:33:01+5:302017-07-13T00:33:57+5:30
परभणी : जिल्ह्यातील २३० कृषी सहायकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.

२३० कृषी सहायकांचे कामबंद आंदोलन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करण्यात यावा व तयार करीत असताना संघटनेस विचारात घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी १० जुलैपासून जिल्ह्यातील २३० कृषी सहायकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत.
राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. याबाबतचा शासन निर्णय ३१ मे २०१७ रोजी निर्गमित करण्यात आला. परंतु, अद्याप कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध काय असेल? याबाबत कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने १० जुलैपासून जिल्ह्यातील २३० कृषीसहाय्यकांनी कामबंद आंंदोलन सुरू केले आहे. कृषीसहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची १०० पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, त्याच अनुषंगाने अधिकारी तदर्थ पद्धतीने कृषीपर्र्यवेक्षकांची पदे भरण्यात यावीत, सुधारित आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावेत, या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या आंदोलनामध्ये आर.के. यादव, यु.के. शेळके, बी.व्ही. काळदाते, आर.एस. मानवते, उमेश माने, हरिभाऊ जाधव, किरण सातपुते, सुहास धोपटे, जुनेद खान, सुभाष धबाले, प्रभाकर गिराम, रोशन करेवार, अशोक जाधव, वैजनाथ रणेर, प्रशांत देवकर, सुदाम उगले, विश्वंभर मोकाशे, नंदकुमार पवार, मदन मुंंडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य कृषीसहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.