छत्रपती संभाजीनगर: न्यायमंदिराच्या शांत वातावरणात आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा थरार आणि क्रूरता उलगडली, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन हेलावले. कोर्टात २३ व्हिडिओ क्लिप्समधून जेव्हा हत्येपूर्वी संतोष देशमुख यांच्यावर झालेली अमानुष मारहाण समोर आली, हत्येचा क्रूर घटनाक्रम पुन्हा समोर येताच देशमुख कुटुंबीयांना शोकाचा बांध आवरता आला नाही.
हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू होती. न्यायमूर्तींसमोर सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे हे पुरावे सादर करत होते.
कोर्टातील साडेसहा तासांची 'वेदना', भाऊ, पत्नीचा आक्रोशसकाळपासून सायंकाळपर्यंत कोर्टात एक-एक पुरावा समोर येत होता, पण जेव्हा सरकारी वकिलांनी लॅपटॉपवर मारहाणीचे २३ व्हिडिओ फूटेज न्यायमूर्तींना दाखवले, तेव्हा कोर्टातील वातावरण जड झाले. ज्या निर्घृणतेने आणि क्रूरतेने संतोष देशमुख यांना मारण्यात आले, त्या क्षणाचा पुन्हा एकदा उल्लेख होणे पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासाठी असह्य होते. ज्यांच्या हसण्या-खेळण्याने संसार फुलला होता, त्या पतीचे वेदनादायक क्षण आठवून त्यांना मोठा धक्का बसला.
कोर्टात अश्रूंचा बांध फुटलापतीच्या क्रूर हत्येच्या क्षणांची आठवण होताच, पत्नी अश्विनी आणि बंधू धनंजय देशमुख यांना कोर्टात अश्रू आवरणे शक्य झाले नाही. गावच्या भल्यासाठी झटणाऱ्या निरपराध भावाची आणि पतीची त्यांनी क्रूर हत्या केली,' या भावनेने त्यांनी तातडीने कोर्टहॉलबाहेर धाव घेतली आणि तिथे ओक्साबोक्सी रडले. त्यांचे अश्रू पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांचेही डोळे पाणावले.
'तोच सूत्रधार आणि तोच मारेकऱ्यांच्या संपर्कात'आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी 'माझा अशिला घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता' आणि 'अटक बेकायदेशीर आहे' असा युक्तिवाद केला. यावर सरकारी वकिलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गिरासे यांनी सांगितले की, अव्हाडा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. सरपंच देशमुख यांनी कंपनी बंद होऊ नये, म्हणून केवळ विनंती केली होती. याच 'विनंती'मुळे चिडून आरोपींनी त्यांचे अपहरण केले आणि निर्घृण हत्या केली. सरकारी पक्षाने सिद्ध केले की, कराड हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे आणि प्रत्यक्ष मारेकरी हत्येच्या वेळी आणि नंतरही कराडच्या कायम संपर्कात होते. सीडीआर रिपोर्ट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि न्यायवैद्यक अहवाल हेच सिद्ध करतात.
पुढील सुनावणी १६ डिसेंबरलामाझ्या निरपराध पतीला मारणारे आरोपी जामिनावर मोकळे सुटणार नाहीत ना? या भीतीने देशमुख कुटुंबीय न्यायालयाकडे आशेने पाहत आहेत. सरकारी पक्षाचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने या भावनिक प्रकरणाची पुढील सुनावणी आता मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी होणार आहे.
Web Summary : The horrific details of Sarpanch Santosh Deshmukh's murder resurfaced in court, leaving his family heartbroken. Evidence presented included disturbing video footage of his brutal assault. The main accused's bail hearing continues, with the next session set for December 16th.
Web Summary : सरपंच संतोष देशमुख की हत्या के खौफनाक विवरण अदालत में फिर से सामने आए, जिससे उनका परिवार टूट गया। पेश किए गए सबूतों में उनकी क्रूर पिटाई के परेशान करने वाले वीडियो फुटेज शामिल थे। मुख्य आरोपी की जमानत याचिका पर सुनवाई जारी है, अगली सुनवाई 16 दिसंबर को होगी।