‘साई’ला २३ लाख माफ
By Admin | Updated: June 11, 2017 00:47 IST2017-06-11T00:47:11+5:302017-06-11T00:47:42+5:30
औरंगाबाद :साई महाविद्यालयाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१६ च्या परीक्षा शुल्काचा २२ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा दंड परस्पर माफ करून घेतला

‘साई’ला २३ लाख माफ
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची देशभर बदनामी करणाऱ्या साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१६ च्या परीक्षा शुल्काचा २२ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा दंड परस्पर माफ करून घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयाने दंडापोटी ६६ हजार ६०० रुपयांचा दिलेला चेकही वटला नाही, हे विशेष. याविषयी स्वाभिमानी मुप्टा संघटनेने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले आहे.
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विविध कारनामे समोर येत असतानाच आॅक्टोबर- नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या सत्र परीक्षेच्या शुल्कातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या सत्राच्या वेळी महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रम आणि सत्रांच्या एकूण १४७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्र (अर्ज) भरले. मात्र हे अर्ज भरण्यास महाविद्यालयाने अतिविलंब केला होता. विद्यापीठाच्या परीक्षा नियमाप्रमाणे मुदतीनंतर अर्ज भरावयाचा असेल, तर प्रतिदिन १० रुपयांप्रमाणे विलंब शुल्क भरावा लागतो. विलंब शुल्काचा कालावधी संपल्यानंतर परीक्षेच्या वेळीही प्रतिविद्यार्थी १६०० रुपये दंड भरून परीक्षा अर्ज दाखल करता येतो. साई महाविद्यालयाने १४७९ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज मुदतीत भरले नाहीत.