ग्रामसेवक परीक्षेसाठी २२९० उमेदवार गैरहजर
By Admin | Updated: November 10, 2014 01:18 IST2014-11-10T01:05:09+5:302014-11-10T01:18:33+5:30
बीड : कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पदासाठी रविवारी जिल्हा परिषदेच्या वतीने भरती प्रक्रिया पार पडली़ दोन सत्रामध्ये झालेल्या परीक्षेमध्ये कोठेही अनुचित प्रकार झाला नाही़

ग्रामसेवक परीक्षेसाठी २२९० उमेदवार गैरहजर
बीड : कंत्राटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पदासाठी रविवारी जिल्हा परिषदेच्या वतीने भरती प्रक्रिया पार पडली़ दोन सत्रामध्ये झालेल्या परीक्षेमध्ये कोठेही अनुचित प्रकार झाला नाही़ परीक्षेमुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांची दिवसभर धांदल उडाली़ दरम्यान, ग्रामसेवक पदाच्या परिक्षेकडे २२९० उमेदवारांनी पाठ फिरवली तर विस्तार अधिकाऱ्याच्या एका जागेसाठी २६५ जणांनी पेपर सोडविला़
कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या २८ जागांसाठी ९२२६ तर विस्तार अधिकारी पदाच्या एका जागेसाठी ४१० अर्ज प्राप्त झाले होते़ जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे भरती प्रक्रियेचे अध्यक्ष तर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी हे सदस्य सचिव होते़ सकाळी १० ते ११़ ३० या वेळेमध्ये ३० केंद्रांवर एकाच वेळी ग्रामसेवक पदांसाठी २०० गुणांची परीक्षा झाली़ ९२२६ पैकी केवळ ६९३६ उमेदवार उपस्थित होते़ दुपारी २ ते ३़३० या वेळेत केएसके महाविद्यालयात विस्तार अधिकारी पदाच्या एका जागेसाठी २६५ जणांनी परीक्षा दिली़ १४५ जणांनी गैरहजर राहणे पसंत केले़
या परीक्षेवेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, सामान्य प्रशासन विभागाचे आऱ आऱ भारती यांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या़ परीक्षेकरिता सुमारे ७० वरिष्ठ अधिकारी, ८५० कर्मचाऱ्यांना ‘ड्युटी’ होती़
‘अन्सर की’ अपलोड
ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविले होते़ एमकेसीएल या संस्थेमार्फत परीक्षा पार पडली़ परीक्षा झाल्यावर लगेचच अन्सर की अपलोड करण्यात आली आहे़ त्यामुळे कुठले प्रश्न अचूक ठरले व कुठले चुकले ? याचा अंदाज उमेदवार बांधू लागले आहेत़ निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे़ (प्रतिनिधी)