बावीस वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात रुजलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:32+5:302021-06-11T04:04:32+5:30
................. स. सो. खंडाळकर औरंगाबाद : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद जिल्ह्यात तशी ...

बावीस वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात रुजलीच नाही
.................
स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद जिल्ह्यात तशी रुजलीच नाही. आज जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आलेला ना खासदार आहे ना एखादा आमदार...! अर्थात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण व शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे हे सतत तीन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत आहेत, ही त्यातल्या त्यात जमेची व समाधानाची बाजू.
एकेकाळी एस काँग्रेसच्या माध्यमातून शरद पवार यांना मराठवाड्याने भरभरून यश दिले. मात्र, असे यश नंतरच्या काळात मिळवता आले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत पैठणमधून एकदा संजय वाघचौरे व वैजापूरमधून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. सध्या राष्ट्रवादीच्या जि. प. सदस्यांची संख्या अवघी दोन आहे. औरंगाबाद महापालिकेत मागच्या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी म्हणजे चार किंवा पाच होती. स्वाती कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली कन्नडची नगर परिषद मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून सुधाकर सोनवणे यांनी काम पाहिले. नंतर पुन्हा एकदा त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पहिल्या जिल्हाध्यक्षा म्हणून छाया जंगले पाटील यांनी काम केले. सध्याही त्या या पदावर काम करीत आहेत.
प्रा. किशोर पाटील यांना दोनदा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली. दिवंगत कैलास पाटील चिकटगावकर, संजय वाघचौरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली. सध्या गंगापूरचे माजी आमदार कैलास पाटील हे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत; परंतु कोरोनाचे संकट सुरू झाले आणि त्यांना औरंगाबाद जिल्ह्यासाठी व इथल्या राष्ट्रवादीसाठी वेळ देता आलेला नाही.
इंदिरा काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय या पक्षांचे मोठे नेते आले की, कार्यकर्ते गर्दी करतात. गटबाजी होते. नेते गेले की पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी अवस्था असते.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावा तसा जनाधार मिळवता आलेला नाही. आज महाविकास आघाडीत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. याचा फायदा औरंगाबाद जिल्ह्यात या पक्षाला होणार का, आगामी निवडणुकांमध्ये युवकांना खरोखरच मोठी संधी उपलब्ध करून देणार का, महापालिका निवडणुकीत दोन आकड्यांचा विजय प्राप्त करणार का, ही सारी आव्हाने जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहेत.